मराठा आरक्षणासाठीचा लढा तीव्र; जागोजागी उभारले जाताहेत आंदोलन, धाराशिव शहरात भाकरी फिरवून राजकीय नेत्यांना दिले बदलाचे संकेत
प्रतिनिधी / धाराशिव
जालना जिल्ह्यातील अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभारले जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील युवकांमध्येही सरकारविरोधात संताप दिसून येत आहे. युवकांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी अन्नत्याग सुरू केला आहे. कळंब तालुक्यातील दहिफळ येथे एका युवकाने 5 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे, त्याची प्रकृती बिघडली असून, धाराशिवमध्येही दोन युवकांनी 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शनिवारी धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील 8 युवकांनी गावात उपोषण सुरू केल्याने गावागावात मनोज जरांगे तयार होत असल्याचे चित्र आहे.
ढोकी येथे आठ युवकांनी आमरण उपोषण सुरू केले असून,
परिसरातील अनेक ग्रामपंचायतीच्या पाठिंब्यासोबतच विविध राजकीय व सामाजिक संघटनांनाही युवकांना पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजाचा आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ढोकीसह परिसरातील देवळाली,वाखरवाडी कावळेवाडी,गोवर्धनवाडी, तुगाव,रूई,बुकणवाडी, माळकरंजा, कोल्हेगाव आदी गावातील लोकांनी शनिवारी ढोकीचे ग्रामदैवत हनुमान मंदिरापासून छ.शिवाजी महाराज चौकापर्यंत जय भवानी जय शिवाजी,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत भव्य रॅली काढली.छ.शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रमोद देशमुख, संग्राम देशमुख, सतिष वाकुरे(ढोकी), प्रज्वल हुंबे,मुकेश जाधव(देवळाली), शिवाजी बेडके (गोवर्धनवाडी), जीवन कावळे(कावळेवाडी), किशोर शेंडगे(तुगाव) यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.यावेळी ढोकीसह परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.धाराशिव येथील आंदोलनस्थळी शनिवारी सकाळी भाकरी फिरवा आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजातील युवकांनी भाकरी फिरवित सर्वच प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. मराठा आरक्षण देण्यात असमर्थ ठरलेल्या राजकीय पक्षांच्या विरोधात घोषणाबाजी करून येणाऱ्या काळात सामाजिक, राजकीय बदलाचे संकेत दिले. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मराठा आंदोलन पेटले असून, उपोषण, बंद,सरकारविरोधात निषेध रॅली काढली जात आहे.धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथील सरपंच नवनाथ सुरवसे यांच्यासह 7 जणांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शनिवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. या उपोषणात नवनाथ सुरवसे, दीपक शिंदे,गणेश पवार, महादेव शिंदे,सर्जेराव शिंदे,किसन शिंदे,अतुल शिंदे, लहू शिंदे यांचा समावेश आहे.
सर्वच क्षेत्रातून पाठिंबा
ढोकी येथे होत असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला मुस्लिम समाजासह रिपब्लिकन सेना,सकल ओबीसी बांधव, संघर्ष ग्रुप, ओबीसी हक्क परिषद, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,ढोकी प्रेस क्लब, आम आदमी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षासह वाकरवाडी, कावळेवाडी, बुकणवाडी, देवळाली,तुगाव,गोवर्धनवाडी- थोडसरवाडी, कोल्हेगाव,रुई या ग्रामपंचायतीनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिल्याचे पत्र दिले.दरम्यान, ढोकी येथील स्नेहलता देशमुख प्रशालेतील विद्यार्थिनींनी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना राख्या बांधून मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे.