प्रतिनिधी / तुळजापूर
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेल्या मराठा आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी तुळजापूर येथील मराठा बांधव दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना पाठिंबा देत या लढाईत सोबत असल्याचा शब्द दिला. दरम्यान योगेश केदार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचा गुरुवारी 61 वा दिवस असून,शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची भूमिका स्पष्ट केली गेलेली नसल्याने आंदोलन वाढतच चालले आहे.
योगेश केदार म्हणाले, ऊन, वारा, पाऊस याची चिंता न करता आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आझाद मैदानात लढत आहोत. त्यासाठी समाजातून देखील पाठबळ मिळत आहे. कालच रात्री देशाच्या रक्षणार्थ कार्यरत असलेले कमांडो रामेश्वर कदम यांनी घरी बनवलेले जेवण आणले. पती-पत्नी दोघांनी आमच्या सोबत आझाद मैदानावर जेवण देखील केले. त्याच वेळी आमच्या तुळजापूरमधून देखील बांधव आले होते.समाज पाठीशी असल्यानंतर बळ मिळते. दररोज नवनवीन क्षेत्रातील मंडळी येऊन भेटतात,त्यांचा पाठींबा मिळतोय.
केदार यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या मुंबईतील सभेला आलेले, आमचे तुळजापूरचे बांधव आझाद मैदानात सुरू असलेल्या वनवास यात्रेत देखील सहभागी झाले. हे राष्ट्रवादीचे नेते दिवसभराचे त्यांचे कार्य उरकून आमच्या भेटीसाठी आले होते. मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनजागृती संदर्भात लोकांमध्ये सुरू असलेल्या सकारात्मक चर्चेबाबत देखील त्यांनी माहिती दिली. आता सगळीकडे ओबीसीमधूनच आरक्षण अशी चर्चा सुरू झाली आहे असा फीडबॅक मिळाला.या सर्वांना 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण कसे मिळेल? यावर सखोल चर्चा केली. आम्ही इथे आझाद मैदानावर बसून आमच्याकडे जेवढे लोक येतील त्यांना आरक्षण म्हणजे काय? हे समजाऊन सांगत असतो. सोशल मीडियातून देखील ओबीसी आरक्षण मागणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचत आहे.
गेलेले आरक्षण मिळवण्यासाठी वनवास यात्रा
23 मार्च 1994 रोजी निघालेला ‘जी आर’ याबाबत, राज्यातील फुगीर आरक्षणबाबत सखोल चर्चा झाल्या. या राज्यात सर्व ओबीसी जाती मिळून जास्तीत जास्त 34% च आहेत त्यांना त्यांच्या हक्काचे केवळ 17% च आरक्षण मिळायला पाहिजे होते, तरी त्यांना 32% आरक्षण लागू आहे. त्यात मराठ्यांचा देखील हिस्सा आहे. 23 मार्च 1994 रोजी काढलेल्या एका ‘जी आर’ मुळे मराठ्यांचा हक्क डावलला गेला. 1990 ला मंडल लागू झाला तेंव्हा या राज्यात सर्व ओबीसी जातींना मिळून केवळ 14% च आरक्षण लागू झाले होते. त्यानंतर सलग पाच वर्ष तेवढेच आरक्षण लागू होते. पण त्या जीआरमुळे उरलेले मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसींना दिले गेले. ते गेलेले आरक्षण पुन्हा मराठ्यांना मिळावे यासाठी ही मराठा वनवास यात्रा आहे. आम्ही एस सी एस टी समाज बांधवांचे 20% आरक्षण मध्ये आरक्षण मागत नाही आहोत. हेही सर्वांनी लक्षात घ्यावे.
-योगेश केदार,आंदोलक