आरंभ मराठी / मुंबई
आरक्षणाच्या मागणीसाठी काल रात्रीपासून मराठा समाजबांधवांचा मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू आहे. आजाद मैदानावर आता क्षणोक्षणी गर्दी वाढत असून, काही क्षणात मनोज जरांगे पाटील स्वतः तिथे दाखल होणार आहेत. रेल्वे स्टेशनसह महत्त्वाचे चौक, रस्ते, सगळीकडे मराठ्यांचा जनसागर उसळला आहे. प्रत्यक्षात मुंबई ठप्प झाली असून, आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
अमानुष लाठीमार ते जनसागराचा उद्रेक
२९ ऑगस्ट २०२३ रोजी अंतरवली सराटी येथील अमानुष लाठीमार हा मराठा समाजासाठी नव्या लढ्याची सुरुवात ठरला. उपोषणकर्त्यांवर झालेल्या निर्दयी लाठीहल्ल्याने समाज पेटून उठला. त्या दिवसापासून हा प्रश्न फक्त जरांगे पाटलांचा राहिला नाही, तर कोट्यवधी मराठ्यांच्या अस्तित्वाचा झाला.
गेल्या दोन वर्षांत सरकारकडून आश्वासनांची माळ मिळाली, पण प्रत्यक्षात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. उलट वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप समाज नेहमीच करीत आला आहे. मात्र जरांगे पाटील झुकले नाहीत, थकले नाहीत. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी सरकारला झुकायला भाग पाडले.
त्यागाचा वारसा
उपोषणाच्या लढ्यापासून, तुरुंगवासापर्यंत, कार्यकर्त्यांसाठी दीड वर्ष घराचा उंबरठा ओलांडला नाही, समाजकारणासाठी जमीन विकली. या त्यागमय कहाण्यांमुळेच मनोज पाटलांच्या मागे लाखोंचा महासागर उभा आहे.
शेवटचा इशारा?
अंतरवली सराटीपासून वडी काळ्या, भांबेरी, साष्ट पिंपळगाव, अशा अनेक टप्प्यांवर झालेल्या उपोषणांनंतर अखेर मराठ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. आजाद मैदानावरील हा जमाव फक्त आंदोलन नाही, तर सरकारला दिलेला शेवटचा इशारा आहे.
सरकार पाटलांना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करते, पण हा नेता बंद दाराआड सौदेबाजी मान्य करत नाही. आता समाजात एकच प्रश्न गुंजतोय दोन वर्षांत जे दिलं नाही, ते आता देणार कधी?
निर्णायक क्षण
६५ वर्षांचा आरक्षणप्रश्न मार्गी लागला नाही, तर प्रत्येक गाव आंदोलनकेंद्र बनेल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. त्यामुळे आजाचा दिवस महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरणार आहे.मनोज जरांगे पाटील हे फक्त एक नेते नाहीत; ते मराठ्यांच्या वेदनांचे प्रतीक आहेत.सरकारला हादरवणारा अपराजित योद्धा.
शब्दांकन:
✍️ प्रा. प्रदीप सोळुंके
छत्रपती संभाजीनगर
मो. ९४ २२ २९ ५१ ५२