कुणाला पाठींबा, ना कुणाला विरोध, मराठ्यांनी संभ्रमात राहू नये..
मनोज जरांगे-पाटील यांचे स्पष्टीकरण
आरंभ मराठी / धाराशिव
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली असून, आपले आदेश आलेत, असे सांगून मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. आपण महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला किंवा पक्षाला पाठींबा किंवा विरोध दर्शविलेला नाही. कुणी आपल्या नावाचा वापर करत असेल तर त्याला जाब विचारा,अवमानित करा, असे धडक आवाहन मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
भूमिका महत्वाची
राज्यात विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विशेषत: मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत असून, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका राजकीय दिशा बदलू शकते, अशी एकंदर परिस्थिती आहे.त्यामुळे जरांगे-पाटील कोणती राजकीय भूमिका घेतात, ते कुणाला मतदान करा म्हणतात, याकडे लक्ष लागले होते.
समाजाने संभ्रमात राहू नये
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करा, असे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते. मतदानाच्या आधी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण निवडणुकीत कुणालाही पाठींबा दिलेला नाही किंवा कुणालाही विरोध दर्शविलेला नाही. त्यामुळे समाजाने संभ्रमात राहू नये, काही भागात मनोज जरांगे पाटील यांचे आदेश आलेत, यांना पाठींबा, त्यांना पाठींबा, याला पाडण्याचे आदेश आलेत, त्यांना पाठींबा देण्याचे आदेश आलेत, अशा प्रकारची चर्चा पसरवली जात आहे. अशा चर्चेमुळे समाजात संभ्रम निर्माण होतो. मात्र मी स्पष्ट सांगतोय की कुणालाही पाठींबा देणार नाही किंवा कुणालाही विरोध करणार नाही.
भविष्य ओळखा !
मराठा समाजाने कुणाच्याही प्रचाराला जावे, कुणालाही मतदान करावे, पण मतदानाला जाताना आपल्या मुला-मुलींना डोळ्यासमोर ठेवा. त्यांचे भविष्य ओळखा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.