पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, अशाच निस्वार्थीपणे काम करणाऱ्या विभुतींचा सन्मान व्हावा
प्रतिनिधी / धाराशिव
कोणी वृक्षारोपणासाठी आपलं योगदान दिलेलं तर कोणी निराधार मुलांसाठी आपलं जीवन समर्पित केलेलं. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात समर्पित भावनेनं काम करणाऱ्या थोर व्यक्तिमत्वांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. धाराशिव येथील लोकसेवा समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भारतरत्न माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त लोकसेवा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या पुरस्कार निवडीबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष अॅड मिलिंद पाटील तर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,शेषाद्री डांगे, कमलाकर पाटील,शिवाजीराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराचे हे १४ वे वर्ष असून हा पुरस्कार मराठवाडा स्तरीय पुरस्कार आहे. यावर्षीचा लोकसेवा पुरस्कार- २०२३ परंडा ( जि. धाराशिव ) येथील जगन्नाथ राजाराम साळुंके, मुरुड ( जि. लातूर ) येथील विद्यासागर चंद्रसेन कोळी आणि बुधोडा ( ता. औसा ) शरद केशवराव झरे यांना प्रदान करण्यात आला.परंडा येथील समसमपुर मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करुन मंदिर परिसरात झाडे लावून सुशोभीकरण करणे तसेच स्मशानभूमी सुशोभीकरण व व्यवस्था केल्याबद्दल जगन्नाथ साळुंके यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार देण्यात आला. बुधोडा ( ता. औसा ) येथे ५१ निराधार , वंचित , उपेक्षित मुलांना संरक्षण , संगोपन व शिक्षण देऊन भावी पिढी घडविणारया शरद केशवराव झरे यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विषमुक्त सेंद्रिय शेती करणारे व शेकडो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची प्रेरणा देणारे मुरुड येथील विद्यासागर चंद्रसेन कोळी यांना यावर्षीचा लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थी यांना रोख अकरा हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
पुरस्काराचे अनन्य साधारण महत्व
पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व असून,निस्वार्थीपणे समाजहिताचे काम करणारे लोक समोर येणे महत्त्वाचे आहे. त्यांनी दुष्काळ, पाणी, प्रदुषण, सेंद्रिय शेती, शेतकरी आत्महत्या, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड .मिलिंद पाटील म्हणाले , निरपेक्ष वृत्तीने लोक कल्याणाचे कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींपासून प्रेरणा घेऊन तरुणांनी कार्य करणे गरजेचे आहे. शेषाद्री डांगे म्हणाले की , अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या उत्तुंग कार्याने जगाला भारताची ओळख करून दिली. निस्वार्थीपणा व सद्भावना जपणारी कर्तृत्ववान माणसं समाजासमोर आणण्यासाठी लोकसेवा समिती गेल्या चौदा वर्षांपासून काम करत असून सर्वांनी हे काम व्यापक स्वरूपात करण्यासाठी सहकार्य करावे. यावेळी सहशिक्षिका मीरा पवार व विद्यार्थीनी नारायणी कुलकर्णी यांनी स्वागत गीत म्हटले तर वर्षाताई पाटील यांनी वैयक्तिक गीत गायन केले. याप्रसंगी लोकसेवा समितीला सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. योगेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक , विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.












