दिवसभरात 2838 दर्शन पास
सुरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर; कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची तुळजाई नगरी भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेली आहे. गुरुवारपासून नाताळनिमित्त सुट्या सुरू झाल्याने भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असून, वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांकडून पेड दर्शन पासची मागणी वाढली आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल 2838 पेड पासची विक्री झाली,त्यामुळे मंदिर संस्थानला अवघ्या एका दिवसात 14 लाख 19 हजार रुपये उत्पन्न मिळाले.महानगरातील शाळांना सुट्ट्या सुरु झाल्या असून, 31 डिसेंबरपर्यंत या सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस गर्दी कायम राहणार आहे.
तुळजापुरात मंदिर संस्थानने या कालावधीमध्ये 200 रुपयांचे दर्शन पास बंद केले असून फक्त 500 रुपयांचे पासच उपलब्ध असणार आहेत. तरीदेखील पहिल्याच दिवशी गुरुवारी दर्शन पाससाठी भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली असून, एकुण 2838 भाविकांनी 500 रुपयांचे दर्शन पास घेत श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले आहे.
या दर्शन पासमध्ये 2633 भाविकांनी ऑफलाईन तर 205 भाविकांनी ऑनलाईन पास घेतले आहेत. यामधून नाताळ सुट्ट्यांच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत 14 लाख 19 हजारांची भर पडली आहे. आगामी दिवसात गर्दी वाढण्याची शक्यता असल्यामुळे मंदिर संस्थानला पेड पासमधून कोट्यावधीचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सर्व स्तरावरील भाविक येत असतात महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकसह देशभरातील भाविक येत असतात. सुट्टी कालावधीत मोठ्या संख्येने भाविक येण्याचा अंदाज असल्याने मंदीर संस्थानने भाविकांना 31 डिसेंबरपर्यंत बिडकर पायऱ्या मार्गे मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून फक्त पेड दर्शन, अभिषेक, व सिंहासन, असणाऱ्या भाविकांना महाव्दारमधून सोडण्यात येणार आहे.
नाताळ सुट्ट्यांमध्ये येणारे भाविक शहरी व व्हिआयपी असल्याने अनेक भाविकांनी पैसे देऊन दर्शन घेणे पसंत केले आहे.









