प्रतिनिधी / धाराशिव
महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘बाई पण भारी देवा’ या चित्रपटाचे महिलांना मोफत शो दाखविण्याचा निर्णय धाराशिव लेडीज क्लबने घेतला असून,क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव आणि तुळजापूर शहरात दोन दिवस म्हणजे शनिवार (दि.29) व रविवारी (दि. 30) चित्रपटगृहात महिलांना चित्रपटाचे शो मोफत दाखविण्यात येणार आहेत. त्यानंतर 1 व 2 ऑगस्ट रोजी कळंब शहरातील चित्रपट गृहात महिलांना मोफत दाखविले जाणार आहेत. दुपारी बारा ते तीन, तीन ते सहा व सहा ते नऊ,अशी या चित्रपटाची वेळ असेल. महिलांनी मोफत चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.
महिलांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘बाईपण भारी देवा’, या चित्रपटाला महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. महिला वर्गाला निखळ आनंद मिळवून देणारा हा चित्रपट इच्छा असूनही अनेक महिलांना गर्दीमुळे किंवा विविध अडचणीमुळे पाहता येत नव्हता. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत.त्यामुळे लेडीज क्लबने धाराशिवसह तुळजापूर आणि कळंब शहरातील चित्रपटगृहात हा चित्रपट मोफत दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.महिलांनी या मोफत चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सौ.पाटील यांनी केले आहे. धारशिव शहरातील ताजमहल टॉकीज, तुळजापूर शहरात जवाहर टॉकीज आणि कळंब येथील पृथ्वीराज चित्र मंदिरमध्ये हे शो दाखविण्यात येणार आहेत. लेडीज क्लबच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमामुळे महिलांना सांस्कृतिक पर्वणी मिळते.