सूर्यकांत पाटणकर / आरंभ मराठी
सातारा; राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणावर भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जलसंपदा विभागाने आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, त्यामुळे धरणातून पडणाऱ्या पाण्यावर तिरंग्याची प्रतिमा उजळून निघाली आहे. ही आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी कोयना धरणावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
शासनाने हर घर तिरंगा मोहीम राबवली असून या मोहिमेद्वारे नागरिकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करावा असे आवाहन केले आहे. या मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, नागरिकांसह शासकीय अधिकारी यांनी शासकीय कार्यालय तसेच जलसंपदा विभागाच्या सर्व धरणांवर विद्युत रोषणाई केली आहे.सातारा जिल्ह्यात हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत जलसंपदा विभागाने महाराष्ट्र राज्याची विजेची व सिंचनाची तहान भागवणाऱ्या कोयना धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
धरणाच्या सांडव्यावर हाय इंटेन्सिटी प्रोजेक्टरद्वारे (90 मी.×55मी.) हे प्रोजेक्शन तयार करण्यात आले आहे.
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले तसेच सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता (सातारा) अरुण नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या विद्युत रोषणाईने संपूर्ण कोयना धरणाचा परिसर तिरंग्याच्या आकर्षक विद्युत रोषणाईत उजळून निघाला आहे.16 ऑगस्टपर्यंत नागरिकांना कोयना धरणावरील आकर्षक विद्युत रोषणाई नागरिकांना दररोज सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत पाहता येणार.यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नागरिकांना भासणार नाही, असे कोयना धरण व्यवस्थापनाने म्हटले आहे.