मंत्र्यांचा विरोधी पक्षावर हल्लाबोल,शूद्र राजकारण नका करू
विशेष प्रतिनिधी / मुंबई
एप्रिल मध्ये खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 14 भाविकांच्या मृत्यूला सरकार कारणीभूत असल्याचा आरोप आज विरोधकांनी विधानसभेत केल्याने मोठा गदारोळ झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने सरकार विरोधी घोषणा देत विरोधकांनी आज सभात्याग केला.
आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खारघर घटना प्रकरणावर पहिलाच प्रश्न होता. मंत्री मुनगंटीवार यांनी खारघर सोहळा आयोजित करताना उन्हाची संभाव्य तीव्रता आणि व्यवस्था चोख होती मात्र वेळेवर उष्णता वाढल्याने हे मृत्यू झाले मात्र विरोधीपक्ष अतिशय घाणेरडे राजकारण करीत असून त्यातून त्यांची शूद्र सत्ताकांक्षा उघड होते, अशी टीका केल्यावर त्याला जयंत पाटील,बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी जोरदार हरकत घेतली. मंत्री मूळ प्रश्नांची उत्तरे न देता राजकीय भाषण करीत असल्याचा आरोप केला.
अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी गठीत चौकशी आयोगाला तीन महिने झाल्यावर आणखी मुदतवाढ कशाला ? सरकार हे प्रकरण गुंडाळू इच्छिते काय असा सवाल केला. तर काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री थेट उत्तरे न देता मागच्या काळात कोणते अपघात झाले,त्यांच्या चौकशी आयोगाना कशी मुदतवाढ दिली हे कशाला उकरून काढत आहेत असा सवाल करून हे आयोजन कुणाच्या सोयीसाठी भर दुपारी उन्हात करण्यात आले ? असा सवाल केला,यावर विरोधी सदस्यांनी घोषणा सुरू करून मंत्ती मुनगंटीवार यांच्या उत्तरात अडथळे निर्माण केले,या गदारोळात विरोधी पक्षाने सभात्याग केला.