प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव शहराचे ग्रामदैवत श्री कपालेश्वर भगवंताची अधिक मास सोमवारनिमित्त 56 भोग महापूजा मांडण्यात आली. यानिमित्ताने महादेवाच्या पिंडीवर आणि सभोवती गाभाऱ्यात 56 प्रकारचे खाद्य पदार्थ मांडून सजावट करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शहरातील भोगावती नदीच्या तीरावर वसलेले महादेव गल्लीतले श्री.कपालेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन असून, शहराचे ग्रामदैवत असलेल्या या मंदिरात दर सोमवारी महाभिषेक आणि महापूजा करण्यात येते. विशेषतः श्रावण महिन्यात भाविकांच्या वतीने तसेच श्री. कपालेश्वर अभिषेक ग्रुपच्या वतीने दररोज विशेष महापूजा करण्यात येते. या काळात कपालेश्वर भगवंताच्या पिंडीला विशेष सजावट करण्यात येते. अधिक मासाच्या निमित्ताने सोमवारी सायंकाळी अभिषेक ग्रुपच्या आणि भाविकांच्या वतीने 56 भोग महापूजा मांडण्यात आली. पुरण पोळीपासून अनेक पक्वान्न आणि फळ,सुका मेवा अशा पदार्थाचा त्यात समावेश होता. भगवंताच्या पिंडीला महाभिषेक करून त्यानंतर 56 भोग महापूजा मांडण्यात आली. त्यानंतर महाआरती करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.56 खाद्यपदार्थांची ही सजावट अत्यंत आकर्षक, लक्षवेधी ठरत होती.यासाठी श्री. कपालेश्वर अभिषेक ग्रुपच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.