गजानन तोडकर / कळंब
मक्याच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार कळंब तालुक्यातील ईटकुर शिवारात उघडकीस आली असून, पोलिसांनी सुमारे 60 लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांना मिळालेल्या माहितीवरून इटकुर येथे एका इसमाने त्याच्या शेतात बेकायदेशिररित्या गांज्याच्या झाडांची लागवड केली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत शेतात छापा टाकून पंचनामा करण्यात आला.यावेळी इटकुर शिवारात गट नं १२०१ मध्ये शेतकरी दशरथ संपती काळे (रा. इटकूर) याने मकाच्या शेतात अवैध गांज्याचे झाडे लावल्याचे आढळून आले. शेतातुन एकुण ५०० किलो ५०० ग्रॅम वजनाची ओलसर गांज्याची झाडे एकुण किंमत ६० लाख, ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर शेतकरी काळे याच्याविरुध्द कळंब पोलीस स्टेशन येथे गुरनं ४७६ / २०२३ कलम २० एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, हनुमंत कांबळे, पोहेकॉ सुनिल कोळेकर, बाळासाहेब तांबडे, चालक पोहेकॉ पांडुरंग माने, पोना दत्तात्रय शिंदे, अजिज शेख, शिवाजी राऊत, मपोना सविता कांबळे, पोअं भरत गायकवाड, करीम शेख, वैजिनाथ मोहीते, फुलचंद मुंढे, रणजित लांडगे, मपोअं रोहीणी चव्हाण, चालक पोअं परमेश्वर मगनाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.