प्रतिनिधी / येरमाळा
शेताच्या वादातुन एकाचा गळा चिरुन खून झाल्याची घटना कळंब तालुक्यातील शेलगाव (जहागीर)येथे बुधवारी मध्यराञी घडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली असुन याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यामध्ये एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेलगाव येथील संतोष भुंजग तवले (४०) व त्यांच्या भावकीतील रविंद्र लिंबराज तवले (३८) यांच्यात पाच वर्षापासून शेताच्या संदर्भात तक्रारी सुरु होत्या. यामध्ये हा वाद हायकोर्टापर्यंत गेला व प्रकरण हायकोर्टामध्ये सुरु आहे. मात्र बुधवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास रोजच्याप्रमाणे संतोष भुंजग तवले शेतातील कोट्यावर झोपण्यासाठी गेला होता.गुरुवारी सकाळी उशिर झाला तरी संतोष झोपेतुन न उठल्याने शेताशेजारचे श्रीनिवास किसन शिनगारे हे सात वाजेच्या सुमारास त्यास उठवण्यासाठी गेले असता कोट्यातील बाजावर संतोषचा अर्थवट गळा चिरुन खून झाल्याचे दिसुन आले.त्यांनी संतोषचा भाऊ संदिप भुंजग तवले यास फोनवरुन घटना सांगितली .या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी एम.रमेश,येरमाळा पोलिस ठाण्याचे सपोनि अतुल पाटील, कर्मचारी किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला. संतोष तवले यांचा भाऊ संदिप भुंजग तवले यांच्या फिर्यादिवरुन रविद्र लिंबराज तवले यांच्याविरुध्द शेताच्या वादातून भावाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास येरमाळा पोलिस करीत आहेत.