प्रतिक गायकवाड यांचे आवाहन, मोहेकर स्मृती व्याख्यान मालेचा समारोप
शाम जाधवर / कळंब
महापुरुष जगले कसे, त्यांचा त्याग, तळमळ, त्यांनी दिलेले योगदान याचा अभ्यास करूनच आपल्याला पुढे जावे लागेल. जहाल मतवादी, मवाळ मतवादी असे कोणत्याही विचारधारेचे हे महापुरुष असू शकतात. त्यांनी दिलेली शिकवणच आपल्याला प्रगत राष्ट्र बनवू शकते, असे मत प्रतीक गायकवाड यांनी व्यक्त केले.
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर स्मृती व्याख्यानमालेतील तिसरे व शेवटचे पुष्प गुंफताना “‘महापुरुषांचे सामाजिक परिवर्तनात योगदान ” या विषयावर ते बोलत होते.
प्रतिक गायकवाड हे कळंबचेच भुमिपुत्र असून, त्यांचे शिक्षणही शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात झाले आहे. त्यांचे व्याख्यान आपल्याच गावात होत असल्यामुळे मोठ्या संख्येने कळंबकर उपस्थित होते.
जगाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध, कीर्तनातून सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे संत तुकाराम महाराज, महिला सक्षमीकरनाचा पाया रचणाऱ्या राजमाता जिजाऊ, बहुजन प्रतिपालक स्वराज्य निर्माते छ. शिवाजी महाराज, गोरगरीबांच्या मुलांना शिकविण्यासाठी शिक्षण संस्था, वसतिगृहे उभ्या करणारे कर्मवीर भाऊराव पाटील, आरक्षण मिळवून देण्यात महत्वाचे योगदान देणारे आणि वर्ण व्यवस्था बंद करण्याचे काम करणारे राजर्षी छ. शाहू महाराज, ग्राम स्वच्छता अभियानाचा पाया रचणारे संत गाडगे महाराज, शिक्षण क्रांती घडवून आणणारे महात्मा ज्योतिबा फुले, भारताचे संविधान लिहिणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी, परिवर्तनवादी विचार मांडणाऱ्या अहिल्या देवी होळकर, अशा सर्वच महापुरुषांचा जीवनपट त्यांनी उलगडून दाखवला.
महापुरुषांमुळेच आपल्याला जीवन कसे जगावे आणि सुसंस्कारित पिढी कशी निर्माण करावी याचे ज्ञान मिळते. सध्याच्या जातीय विचारांमुळे सामाजिक वातावरण खराब होत चालले आहे. महापुरुषांनाही आपण जाती धर्मांमध्ये विभागून टाकले आहे. महापुरुषांची कोणतीही जात नसते, धर्म नसतो. सर्व महापुरुष हे सर्व धर्म समभाव हीच शिकवण देतात, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अशोक मोहेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार, प्राचार्य प्रा. अनिगुंठे सर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयीन कर्मचारी, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष रवी नारकर, सचिव प्रा. साजेद चाऊस, प्रोजेक्ट चेअरमन अरविंद शिंदे, सर्व रोटरी सदस्य आणि शेकडो श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. साजेद चाऊस यांनी केले.