प्रा.डॉ.विश्वाधार देशमुख यांचे मत; मोहेकर स्मृती व्याख्यानमालेला प्रतिसाद
शाम जाधवर / कळंब
ऍनिमलसारखा हिंसेचे प्रतीक असणारा चित्रपट आपल्या देशात ९०० कोटींची कमाई करतो म्हणजे आपल्याकडे हिंसक प्रवृत्ती वाढते आहे. मानवी प्रजाती टिकवण्यासाठी श्रीकृष्ण, श्रीराम, गौतम बुद्ध या सर्वांचे करुणेचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत. प्रेमाची अडीच अक्षरे समजणाराच खरा पंडित असे संत कबीर सांगून गेलेत, ते आपण आचरणात आणणे आवश्यक आहे, असे मत प्रा.डॉ. विश्वाधार देशमुख यांनी व्यक्त केले.
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना “‘भुतां परस्परे जडो मैत्र जीवांचे” या विषयावर ते बोलत होते.
सध्याच्या आभासी दुनियेत माणसाचा आत्मा हरवत चालला आहे. जगामध्ये २० लाख प्रकारच्या प्रजाती आहेत. त्यात मानवी प्रजात सर्वश्रेष्ठ आहे. माकड-वानर-मानव असा प्रवास करून आपली प्रजाती तयार झाली. हातांचा शोध, अग्निचा शोध, चाकाचा शोध, भाषेचा शोध आणि नात्यांचा शोध हे माणसाच्या उत्क्रांतीचे टप्पे आहेत.
अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हींच्या संयोगातून नाते संबंध सुधारण्याची गरज आहे. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यातून नाते संबंध टिकवायची शिकवण दिलेली आहे. मानवातील खल प्रवृत्ती, विकृती कमी व्हायला पाहिजेत, तरच माणूस धर्म टिकेल. जैविक उत्क्रांती आणि सांस्कृतिक उत्क्रांती हा इतर जीव आणि मानव यातील मुख्य फरक आहे.
जगणं आणि बोलणं यातील अंतर कमी करा. आपण जे बोलतो ते वागतो का, याकडेही लक्ष द्या. निष्ठेची जाणीव आणि महत्त्वच आपण विसरून चाललो आहोत. ज्योतिबा -सावित्री यांचं जगणं- वागणं कसे असेल हे नवीन पिढीला कळाले पाहिजे. आपल्या मुलांना संस्कार देताना करुणेचा संस्कार द्या. सौजन्य हा अलंकार आहे, हे त्या बालमनावर बिंबवा, त्यांचे कुतूहल जागवा, जिज्ञासा वाढवा. तरच चांगली नवीन पिढी आपण उभी करू शकू, असेही ते म्हणाले.
ज्यांनी शेण फेकून मारले, त्यांना शिक्षण देता आले पाहिजे, ज्यांनी जातीवरून हिणवले त्यांना संविधान देता आले पाहिजे, ही करुणेची शिकवण देणारा आपला समाज आणि देश आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अशोक मोहेकर तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार, प्राचार्य प्रा. अनिगुंठे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयीन कर्मचारी, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष रवी नारकर, सचिव प्रा. साजेद चाऊस, प्रोजेक्ट चेअरमन अरविंद शिंदे, सर्व रोटरी सदस्य आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय घुले यांनी केले.