प्रा.डॉ. संजय चौधरी यांचे मत, कळंबमध्ये मोहेकर स्मृती व्याख्यान मालेला सुरुवात
प्रतिनिधी / कळंब
आपली भौतिक प्रगती ही खरी प्रगती नसून नैतिक प्रगती महत्वाची आहे. विद्येविना मती गेली याच्या आधीची निती महत्वाची आहे, ही शिकवण सर्व संतांनी दिली असून, पिंडदान तसेच कावळा शिवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही या सर्व भ्रामक कल्पना आहेत. मोक्ष प्राप्तीसाठी व्रत वैकल्ये करण्याची गरज नाही, ही शिकवणही संतांनी दिली आहे, समाजातील चुकीच्या परंपरेविरुद्ध संतांनी लढा दिला असे मत प्रा. डॉ.संजय चौधरी यांनी व्यक्त केले.
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
12 वर्षांपासून ही व्याख्यानमाला कळंब येथे आयोजित केली जाते.दरवर्षी 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर अशी 3 दिवस ही व्याख्यानमाला चालणार आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प करमाळ्याचे प्रा.डॉ. संजय चौधरी यांनी गुंफले. वारकरी संतांचा लढा लढण्याची गरज, या विषयावर ते बोलत होते.
वैदिक धर्माला विरोध करणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि संत तुकोबा महाराज अन् संत ज्ञाेश्वरांनी दिलेल्या कर्म कांड विरोधी विचारांची आधुनिक गुंफण उलगडून सांगत त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
डॉ. चौधरी म्हणाले, संत शिरोमणी नामदेव महाराज यांना पंजाबमध्ये भगवान नामदेव म्हटले जाते. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही शिकवण देणारे संत ही त्यांची ओळख आहे. आपले दान, धर्म, पुण्य करण्यामागचे कारण म्हणजे स्वर्ग पाहिजे. परंतु आपल्याला माहीत असलेल्या हरीपाठामध्ये पहिल्या 4 ओळीतच सर्व सार सांगितलेला आहे.
“हरिमुखे म्हणा हरीमुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी”
याचाच अर्थ दुसऱ्यांचा आत्मा सुखी करणे, हाच खरा परमार्थ होय.
वैदिक धर्माला ज्ञानदेवांनी विरोध केला आणि तेही विद्रोही संत ठरले. इतिहास आपल्याला खूप काही शिकवून जातो, परंतु आपणास त्याचा विसर पडू नये हे महत्वाचे.
सत्यनारायण विधीची इतिहासात कोठेही नोंद नाही. सत्यनारायण म्हणजे आजची रोजगार हमीची योजना आहे. मनुष्य जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अगदी “गर्भ संस्कार ते अंतिम विधी”, आणि मृत्यू नंतर दहावा, तेरावा हे सर्व कर्मकांड कशाला पाहिजे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जगातल्या कोणत्याही दुर्बिणीतून
वैकुंठ, कैलास, स्वर्ग, नरक दिसलेले नाहीत, आपण अगदी मंगळ गृहापर्यंत गेलो तरीही हे आपल्याला किंवा अन्य प्रगत राष्ट्राला दिसले नाही याचाही विचार व्हावा अन् आपल्या संतांची शिकवण आपण आचरणात आणावी असेही प्रतिपादन त्यांनी केले.
संतांनी मोक्ष नाकारला यावर बोलताना प्रा. चौधरी म्हणाले की, वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या ज्ञानोबाना आणि कळस असणाऱ्या तुकोबांना मोक्षाची गरज वाटली नाही.
गुरू परंपरा संत तुकोबांनी नाकारली.
तुकोबांच्या अभंगामध्ये शेकडो अभंग बनावट बनवून घातले आहेत.
आपण केलेल्या बंडाचा शेवट अकाली मृत्यू हे संत तुकोबाला जाणवले होते, म्हणूनच त्यांनी
“लावुनी कोलीत,
माझा करतील घात”
असा अभंग बोलून दाखवला होता.
जातीच्या, धर्माच्या, वर्णाच्या, पोलादी चौकटीला भेदण्याचे काम आणि त्यासाठी लढा संतांनी दिला.
ज्ञान प्रसारासाठी कीर्तन उपयोगी आहे, याची जाणीव संत नामदेवांनी करून दिली. जेथे कीर्तन करतो तिथे अन्न ही घेऊ नका ही शिकवण संत तुकोबांनी दिली. आजचे महाराज मात्र कीर्तनासाठी लाखोंच्या सुपाऱ्या घेऊन फक्त मनोरंजन करतात हे कितपत योग्य असा सवालही प्रा. चौधरी यांनी उपस्थित केला.
वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचे जनक नामदेव महाराज हे महाराष्ट्र सोडून पंजाबला गेले ते कशासाठी याचाही अभ्यास तरुण पिढीने करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
“आलिया भोगासी असावे सादर”
येवढाच अभंग आपल्याला पाठ आहे.
परंतु खरा अभंग –
“आलिया भोगासी असावे सादर,
देवावरी भार घालू नये”
असा आहे.
प्रयत्न वाद ही संतांची शिकवण असून ती आपण शिकावी अन् नवीन भारत घडविण्यात आपला सहभाग नोंदवावा असे मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गुंडरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अशोक मोहेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार, प्राचार्य प्रा. अनिगुंठे सर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयीन कर्मचारी, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष रवी नारकर, सचिव प्रा. साजेद चाऊस, प्रोजेक्ट चेअरमन अरविंद शिंदे सर्व रोटरी सदस्य आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.