मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा अध्यक्षांकडे या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी पक्षविरोधात निर्णय घेतल्याप्रकरणी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या आमदारांवर शिस्तभंगाची कार्यवाही केली आहे.
आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांवर पक्षविरोधात कार्यवाही केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तक्रार प्राप्त झाली असून लवकरच यावर विचार करणार आहे .प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबंधित आमदारांनी पक्ष विरोधी कार्यवाही केल्याची तक्रार निवडणूक आयोगालासुद्धा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी कराड येथे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत, राष्ट्रवादी काँग्रेसची पुर्नबांधणी करणार असल्याचे जाहीर केले.