–अनंत साळी, जालना
स्ट्रॉबेरी म्हणजे थंड वातावरणातील पीक, त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी या पिकाच्या मागे लागत नाही.आपल्याकडे वातावरणच नाही मग कशाला प्रयोग करायचा, हा विचार. पण जालन्यातील एका तरुणाने मात्र या विचाराला छेद दिला. महाबळेश्वरसारख्या थंड ठिकाणी येणार स्ट्रॉबरीचं पीक जालना शहराच्या औदयोगिक वसाहतीतील घराच्या गच्चीवर घेण्याचा यशस्वी प्रयोग महेशनं केला आणि तो यशस्वी झाला.
पंचविशीतला महेश गायकवाड,जालना (jalna)शहराच्या भर औद्योगिक वसाहतीत राहणारा, कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा जिज्ञासू तरुण. घराच्या आजूबाजूला स्टील कंपन्या असल्याने वातावरणाचा विचार न केलेलाच बरा. महेशला फळबागांची आवड आहे. बाजारात दिसणारी वेगवेगळी फळं आपल्याकडे कशी घेता येतील,याचा विचार तो करत असतो. त्याविषयी समाजमाध्यमातून माहिती घेतो. त्यातूनच स्ट्रॉबेरी पीक घेण्याचं त्यानं मनावर घेतलं. मुख्य आव्हान तापमानाचं होतं . जालन्याचं तापमान महाबळेश्वरपेक्षा ७-८ अंश सेल्सिअस जास्त आहे. पण हलक्या जमिनीत कमी पाण्यात येणाऱ्या या पिकाची निवड करून महेशनं स्ट्रॉबेरीच्या झाडांचा मळा फुलवला. तोही पूर्णपणे सैंद्रीय पद्धतीनं.
सप्टेंबर महिन्यात महेशनं महाबळेश्वरवरून स्ट्रॉबेरीची ४०० मायक्रो रोपे मागवली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यानं आपल्या घरावरील ६०० स्क्वेअर फुटांच्या गच्चीवर घराच्या गच्चीवर प्लास्टिक पिशव्यांमध्ये लागवड केली. विंटर डॉन जातीच्या या स्ट्रॉबेरीच्या जातीची रोपं आणताना मूळ मातीतले जीवाणू महेशनं जपले. सैंद्रीय खताचाच वापर. किडीपासून संरक्षणासाठी निंबोळी पेंडी. ठिबकच्या साहाय्यानं रोपांच्या भोवती ओलसरपणा टिकवून ठेवत तापमानाच्या आव्हानावर तोडगा काढला.
लागवडीच्या ३ आठवड्यानंतर रोपांना फुलं आली. पुढील ६ आठवड्यांनी स्ट्रॉबेरीची फळं यायला लागली आणि औद्योगिक वसाहतीत स्ट्रॉबेरी बहरू शकते हा महेशचा प्रयोग यशस्वी झाला. महेशच्या घराच्या गच्चीवर रसाळ, मधुर,लाल चुटुक स्ट्रॉबेरी बहरली. यासाठी त्याला खर्च आला २१ हजारांचा. त्याच्या या बागेला भेट देण्यासाठी जिल्ह्यातील लोक उत्सुकतेनं येत आहेत. महेशचा मित्र करण सांगतो, ”महेशनं अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. शेती नसताना त्यानं टेरेसवर स्ट्राबेरी घेतली. माझ्याकडे तर शेती आहे, त्यामुळे महेशकडून रोपं घेऊन त्याची लागवड करत असल्याचं करण सांगतो. त्याच्याकडून रोपं विकत घेणाऱ्यांना तो संपूर्ण मार्गदर्शन करत आहे.
महेश सांगतो, ”वातावरण आणि पीक हे गणित आपल्या डोक्यात पक्कं बसलेले असतं. त्यामुळे प्रयोगशीलतेची वाट आपण धरत नाही. त्यामुळे अनेक चांगली पिकं घेण्यापासून आपण वंचित राहतो.”(नवी उमेद navi umed)