प्रतिनिधी / मुंबई
कोरोना काळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दोषी ठरवत निलंबित करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आज विधान परिषदेत केली. त्यामुळे आरोग्य खात्यातील गैरव्यवहारावर एकप्रकारे शिक्कमोर्तब झाले आहे.
डॉ. सावंत म्हणाले, परभणी जिल्हा रूग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कोरोना काळात केलेल्या वित्तीय अनियमितेची चौकशी पूर्ण केली आहे. त्यामध्ये ते दोषी आढळल्याने त्यांचे निलंबन केले आहे.आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विधानपरिषदेत ही घोषणा केली.याबाबत प्रश्न सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, परभणीचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी त्यांच्या कार्यकालात वित्तीय अनियमितता केली आहे. त्याचे लेखापरिक्षणही करण्यात आले आहे.खरेदी केलेल्या साहित्याची नोंद नसणे, राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी खर्चासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केला नाही. खरेदी प्रक्रियेच्या नियमांचे पालन न करणे, खर्च करण्यात आलेल्या रकमेपैकी काही देयके सादर न करणे, कोरोना कालावधीत नियुक्त डॉक्टरांचे नियुक्तीपत्र उपलब्ध न करणे, ४ कोटी ७२ निधीपैकी ५१ लक्ष निधीचे देयक सादर न करणे, लॉगबुक गहाळ असणे, अशा बाबी आढळून आल्या आहेत, अशी माहिती मंत्री डॉ. सावंत यांनी दिली.