आरंभ मराठी / धाराशिव-कळंब
निसर्गाचा प्रकोप आणि मानवी जीव धोक्यात आलेले क्षण..अशा कठीण परिस्थितीत लोकप्रतिनिधी फक्त दिलासा देतात, अशी धारणा असते. पण सोमवारी मध्यरात्री कळंब तालुक्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात आमदार कैलास पाटील हे मात्र प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले. नदी-तलावाच्या काठावर धोक्यात आलेल्या शेकडो नागरिकांना वाचवण्यासाठी त्यांनी रात्रभर पावसात, अंधारात, चिखल तुडवत जीवाची बाजी लावली.त्यांच्या या कर्तव्याबद्दल कमालीचे कौतुक होत आहे.
रात्री साडेबारा वाजता कळंब तालुक्यातील मांजरा नदीच्या पुरामुळे खोंदला परिसरातील नागरिक पूर्णपणे पाण्याच्या वेढ्यात सापडले होते. महिलांपासून लेकरांपर्यंत प्रत्येकाला वेळेत सुरक्षित स्थळी पोहचविण्याचे आव्हान होते. या कठीण प्रसंगी आमदार पाटील स्वतः गावकऱ्यांसोबत मदतीसाठी सरसावले. पुराचे पाणी वाढत असताना त्यांनी प्रत्येक कुटुंब सुरक्षित स्थळी पोहोचवले.
मलकापूर पाझर तलावाचा धोका
यापूर्वी रात्री उशिरा ते मलकापूर येथील पाझर तलावाजवळ मदतीसाठी गेले. तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. अंधार, चिखल, सततचा पाऊस या सगळ्याची पर्वा न करता ते गावोगाव फिरून लोकांना सावध करत राहिले. स्वतः हातानेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम त्यांनी केले.
आथर्डीतील मध्यरात्रीची मदत
खोंदला येथील नागरिकांना सुरक्षित केलेल्या अवघ्या काही वेळानंतर, रात्री तब्बल १:१५ वाजता पाटील आथर्डी येथे दाखल झाले. येथे पाण्यात अडकलेल्या कुटुंबांना ते स्वतः बाहेर काढत होते.
_
जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी उतरले पाण्यात
लोकप्रतिनिधीपणाची खरी व्याख्या काय आहे,संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावणे..हे कार्य जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधीनी केल्याचे दिसून येत आहे. कालच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून परांडा तालुक्यातील अनेक जीव वाचवले. आमदार कैलास पाटील यांनी रात्रभर चालवलेले हे प्रयत्न म्हणजे लोकांच्या जीवासाठी केलेला संघर्ष होता. पावसाची पर्वा न करता लोकांच्या हाकेला धावून जाणारे हे काम पाहून अनेकांनी पाटील यांच्या धैर्याचे कौतुक केले. अशा प्रसंगी लोकप्रतिनिधींचे खरे कार्य काय असते याचे उदाहरण त्यांनी घालून दिले.