प्रतिनिधी / भूम
सदैव जे असतात, हरीनामात दंग, असावे ते सदा आरोग्य संपन्न,असा संदेश देत खास भजनी मंडळ आणि वारकरी बांधवांसाठी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने आयुष्यमान भव,महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबीर रविवारी (दि.31) सदगुरु शामनाथ महाराज देवस्थान श्रीक्षेत्र सामनगाव (जुने)(ता. भूम) येथे होणार आहे.
या शिबिराची जय्यत तयारी सुरू झाली आहे. प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सर्व रोगांसाठी हे भव्य मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये तज्ञ डॉक्टर व सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर यांच्या मदतीने मोफत सेवा देण्यात येणार आहे.
सदरील महाआरोग्य शिबिरामध्ये स्त्रीरोग, हृदयरोग, नेत्रतपासणी व मोफत चष्मेवाटप, रक्तदाब,मधुमेह तपासणी,आयुष्मान कार्ड वाटप,आभा कार्ड वाटप,कॅन्सर तपासणी,सोनोग्राफी,एक्स रे,आयुर्वेदिक, युनानी,होमिओपॅथी आदी तपासणी व ओषधोपचार केले जाणार आहेत.
वारकऱ्यांनी शिबिरासाठी येताना सोबत दोन पासपोर्ट साईज फोटो व आधारकार्ड आणावे तसेच सर्व जुने रिपोर्ट व फाईल असेल तर सोबत आणावी,असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान या शिबिराची जय्यत तयारी सुरू झाली असून, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरदास यांच्यासह अधिकाऱ्यांनी गुरूवारी दिवसभर थांबून तयारीचा आढावा घेतला.
आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांची संकल्पना
तीर्थक्षेत्र सामनगाव या पवित्र स्थळी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. वारकरी परंपरेत आरोग्यालाही महत्व आहे. आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या संकल्पनेतून वारकरी बांधवांसाठी पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.गावागावातून भजनी मंडळ, वारकरी बांधवांनी शिबिरात सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले आहे.हे शिबीर रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
शिबिरासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरदास यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ईस्माइल मुल्ला, आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले यांनी पुढाकार घेतला आहे.