अत्याचाराच्या घटना कायम, कडक कारवायांची गरज
आरंभ मराठी / धाराशिव
एका नऊ वर्षांच्या बालिकेवर तसेच 25 वर्षांच्या महिलेवर एकाच दिवशी चार तासाच्या फरकाने लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनांनी जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. तुळजापूर तालुक्यातील एका गावात 9 वर्षीय चिमुकलीवर तर वाशी तालुक्यातील एका गावात महिलेवर अत्याचार झाला आहे.
तुळजापूर तालुक्यातील एका गावातील एक 9 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) ही दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता किराणा दुकानात कुरकुरे आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी गावातील एका तरुणाने तिला घरात बोलावून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी तरुणाने बालिकेला दिली. पिडीत बलिकेच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम- 64(2)(i), 65(2), 75(1), 351(2) सह कलम 4, 8,10,12 बा.लै.अ.अधि 2012 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धाराशिव जिल्ह्यातील ही आठ दिवसातील दुसरी घटना आहे. मागील आठवड्यात लोहारा येथे एका तीन वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. एकाच आठवड्यात दोन घटना घडल्यामुळे धाराशिव जिल्हा हादरला आहे.
तसेच याच दिवशी म्हणजे 16 तारखेला वाशी तालुक्यातील एका गावात एका 25 वर्षीय महिलेला पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला तसेच तिला या घरात कोंडून ठेवण्यात आले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात महिला तसेच लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.