स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
प्रतिनिधी / वाशी
पर्जन्यमापन नोंदवही दप्तरवरील पावसाच्या नोंदी न बघता प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची दयनीय अवस्था बघा आणि शेतकऱ्यांना तत्काळ पीक विम्याचा २५ टक्के अग्रिम मंजूर करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार व कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुक्यात पावसाने मोठा खंड दिला असून याचा विपरीत परिणाम तालुक्यातील शेती उत्पादनावर झाला आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी २५ टक्के अग्रिम मिळण्यासाठी जिल्ह्यातील काही अत्यल्प पर्जन्यमान झालेल्या मंडळात पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र तालुक्यातील तीन पैकी एकाही मंडळाचा यात समावेश करण्यात आलेला नाही.परिणामी विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम आपल्याला मिळेल की नाही या संभ्रमात तालुक्यातील शेतकरी आहेत. पावसाचा पडलेला मोठा खंड त्यामुळे बहुतांशी भागात पिके सुकली आहेत तर असमतोल पाऊसामुळे ज्या भागात पाऊस पडला त्याठिकाणी उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.तालुक्यात सुरुवाती पासूनच असमतोलित पाऊस असून पर्जन्य मापकावरील पर्जन्यमान तपासून पंचनामे करणे चुकीचे ठरू शकते.त्यामुळे पर्जन्यमान न बघता मोक्यावर जाऊन पिकांची दयनीय अवस्था बघा आणि सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम तत्काळ द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केली.यासह सततच्या पावसाचे अनुदान वाटप करा,वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नोंद करून त्यांनाही लाभ द्या,५० हजार प्रोत्साहन योजना गतिमान करा, कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करा अशा मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी राम बर्वे यांना दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष ऍड वसंत जगताप,गजानन भारती,संजय कवडे,राम घुले,नानासाहेब उंदरे,चंद्रकांत उंदरे,पांडुरंग घुले, बाळासाहेब नगरे,शंकर भालवणे,बाळासाहेब घुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.