अमोलसिंह चंदेल। शिराढोण
शिराढोण (ता.कळंब) व परिसरातील शिवारात रानडुकरांचा प्रचंड उपद्रव वाढला असून, बहरात येऊ लागलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.वन विभाग तसेच कृषी विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
शिराढोणसह परिसरातील कृषी मंडळ अंतर्गत येणा-या गावात रान डूकरांचा मोठा त्रास दरवर्षीच शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मात्र याकडे कुठल्याही सरकारी यंत्रणेचे लक्ष नसल्याने रान डूकरांपासून होणारे नुकसान व त्याचा तोटा येथील शेतकरी सहन करत आहेत. पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती तसेच उपलब्ध जलस्त्रोतांवर उभा असलेला ऊस रातोरात रानडूकर शेतात धूमाकूळ घालून नुकसान करत आहेत.तसेच अन्य पिकांचे नुकसान केले जात आहे. याबाबत शासन स्तरावर गांभीर्याने दखल घेवून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पेरणीपासूनच होतोय त्रास
परिसरात खरीप हंगामासह सोयाबीन, मका आदी पिके तसेच ऊस शेतीही मोठ्या प्रमाणात आहे. परंतू शेतक-यांचे मका पीक तर अक्षरशः पेरणी केली केल्यानंतर उगवण्यापूर्वीच डूकरांकडून फस्त केले जात आहे. जमीनीत पेरलेली बियानेही खाऊन टाकत धूमाकूळ घातला जातो. तसेच सध्या ऊसाचे उभे पिक रातोरात जमीनदोस्त करतात. त्यामूळे शेतक-यांचे मोठे नुकसान सध्या होत आहे.
शेतकऱ्यांवर हल्ला करतात रानडुकरे
यावर्षी माझ्या शेतात दोन एकरावर ऊस तसेच काही सोयाबीनचे पीक आहे. दररोज रात्री शेतात रानडूकर येवून थैमान घालत पिकांचे नुकसान करत आहेत. ऊसाच्या शेतात तर रातोरात उसाचे ढिगारे घालून मोठे नुकसान रानडूकर करत आहेत. पिक बचावासाठी रात्री शेतात जावे तर रान डूकर शेतक-यांवर हल्ला करतात. त्यामुळे रात्री त्यांना उधळून लावण्यासाठी कोणताही शेतकरी धजावत नाही.
– अवधूत पाटील, शेतकरी, शिराढोण.