खासदार-आमदारांसह मान्यवरांच्या हस्ते उद्या प्रकल्पाचा शुभारंभ
आरंभ मराठी / धाराशिव
वृक्ष लागवड आणि संगोपनात अलीकडे जागृती निर्माण झाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड महत्वाची असून, जिल्ह्याचे वनक्षेत्र किमान 10 टक्क्यांवर अपेक्षित आहे. मात्र सध्याचे प्रमाण 1 टक्क्यांच्या आतच आहे. त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील तसेच माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या पुढाकारातून, वडगाव येथील श्री.सिद्धेश्वर मंदिर संस्थान आणि विविध सामाजिक संस्थेच्या सहभागातून वडगावच्या ओसाड माळरानावर वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहेत. विविध 300 जातींच्या 10 हजार झाडांची लागवड करण्यात येणार असून, रविवारी (दि.29) सकाळी 7 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी धाराशिव शहरातील पर्यावरण प्रेमींनी उपस्थित राहून वृक्ष लागवड मोहिमेत योगदान द्यावे,असे आमदार कैलास पाटील यांनी केले आहे.
पर्यावरणपूरक देशी झाडांची लागवड
आमदार कैलास पाटील यांनी सिध्देश्वर देवराई प्रकल्पासाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली होती.
झाड लावा तुम्ही, जगवतो आम्ही ही अभिनव संकल्पना घेऊन त्यांनी वडगाव (सि) येथील श्री. सिद्धेश्वर मंदीर परिसराला निसर्गसंपन्न बनविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी धाराशिव फाउंडेशनच्या वतीने तसेच श्री.सिद्धेश्वर देवस्थान आणि वडगाव (सि) ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सिद्धेश्वर देवराई विकसित केली जात आहे. यातील वृक्ष लागवडीसाठी, सह्याद्री, बालाघाट डोंगर रांगामध्ये आढळणाऱ्या 300 देशी झाडांच्या प्रजातीची, सुमारे 10 हजार रोपे संकलित करण्यात आली आहेत.
आमदारांचे शहरवासीयांना निमंत्रण
श्री क्षेत्र सिद्धेश्वराच्या पावनभूमीत निसर्गरम्य डोंगरदऱ्यामधील या सिद्धेश्वर देवराईचे वृक्षारोपण, हे आपण आणि आपल्या परिवाराच्या तसेच आपल्या संस्था-संघटनेतील पदाधिकारी, सदस्य, मित्रमंडळींच्या हस्ते एक एक रोपटं लावून व्हावे आणि या सामाजिक कार्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहावे म्हणून आमदार कैलास पाटील यांनी धाराशिववासियांना विशेष निमंत्रण दिले आहे.
पाणी, सुरक्षा अत्यंत चोख नियोजन,
या प्रकल्पात कोणते झाड, कोणाच्या शुभहस्ते लावण्यात आले आहे, याचीही डिजिटल नोंद घेऊन त्या आठवणी कायमस्वरूपी जतन करण्याचा प्रयत्न होणार आहे. संपुर्ण सिद्धेश्वर देवराईला मजबुत काटेरी तारेचे कंपाउंड लावून संरक्षित केले आहे. पाण्याच्या सोईसाठी बोअर वेल, पाईपलाईन आणि एकूण 80 हजार फुट लांबीची ठिबक सिंचन यंत्रणा बसवली आहे. झाडांच्या आकारमानानुसार योग्य अंतरावर खड्डे घेतले आहेत. अंतर्गत रस्ते आणि झाडांच्या उपयुक्ततेनुसार पुढील प्रमाणे 12 गार्डन बनवले आहेत.
प्रकल्पाची ही आहेत वैशिष्ट्ये
1) आयुर्वेदीक वृक्ष गार्डन 2) बॉटनीकल वृक्ष गार्डन 3) फ्लॉवर्स गार्डन 4) अन्नपूर्णा फ्रुट्स गार्डन 5) नक्षत्र वृक्ष गार्डन 6) धर्म गार्डन (सर्व धर्मातील पवित्र वृक्ष) 7) तिर्थनकर गार्डन 8) राज्य वृक्ष गार्डन 9) इसापूर राजा गार्डन (स्थानिक वृक्ष) 10) दुर्मिळ वृक्ष गार्डन 11) ग्रास, रूट गार्डन 12) डेन्स फॉरेस्ट 13) शेततळे, पक्षी पाणवठा, ध्यान केंद्र, व्हिव पॉइंट,असा वैशिष्टयपूर्ण हा प्रकल्प असेल.
लोकचळवळ, सहभागी व्हा
वडगाव ग्रामस्थ, सिद्धेश्वर देवस्थान आणि विविध संस्थांच्या सहभागातून ही लोकचळवळ उभी राहिली आहे. यातून भव्य वृक्ष लागवड आणि संवर्धन मोहीम प्रकल्प राबविण्यात येत आहे. पर्यावरण प्रेमींनी या लोक चळवळीत सहभाग नोंदवावा आणि पर्यावरणासाठी आपला हातभार लावावा.
– कैलास पाटील, आमदार