शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांची माहिती
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नव्हे तर मराठवाड्यातील आजवरचा सर्वात मोठा म्हणजे 50 हजार युवक, युवतींना रोजगार देणारा महा रोजगार मेळावा धाराशिव शहरात आयोजित करण्यात आला आहे . हा मेळावा 29 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत आदींच्या उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यासह देशभरातील आणि परदेशातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. दरम्यान, महा रोजगार मेळाव्यासाठी आपण पाठपुरावा केला होता,त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिसाद दिला आणि मेळाव्याची संधी धाराशिव शहरात उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपण मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानतो,अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात योगेश केदार म्हणाले, या मेळाव्यातून 50 हजारपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळवून देण्यात येणार आहे. माझ्या आग्रहाखातर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मेळावा मंजूर केला. वास्तविक पाहता हा मेळावा विभागीय केंद्रांमध्ये होतो. पण आजपर्यंत माझ्या जिल्ह्याला विकासापासून दूर ठेवण्यात आले. बेरोजगारांची संख्या मोठी आहे. फारसे मोठे प्रकल्प मंजूर झाले नाहीत. त्यामुळे माझा जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून नोंद झाला आहे. जिल्ह्याची वास्तव परिस्थीती अवगत करून धाराशिव येथे रोजगार मेळावा मंजूर करून घेतला.शासनाकडून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना आदेश देखील पोचले आहेत. आता राज्यातील मोठमोठ्या कंपन्या बोलावण्यात येतील. तसेच जास्तीत जास्त तरुणांनी यासाठी नोंदणी करावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वात यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन हा मेळावा धाराशिव देण्याचे मान्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी संतोष राऊत यांनी याकामी महत्वाची मदत केली.
सर्वांना सोबत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला जाईल. पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे मार्गदर्शन घेतले जाईल,असे केदार म्हणाले.दरम्यान या मेळाव्यात अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.