अभिजीत कदम / धाराशिव
एकीकडे शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा बागुलबुवा सुरू असताना ग्रामीण भागात सुविधांची कमतरता असतानाही जिल्हा परिषदेच्या शाळा नावलौकीक मिळवू लागल्या आहेत. कसबे तडवळे,बारूळ,वागदरी, भाटशिरपुरा, हासेगाव केज अशा अनेक जिल्हा परिषद शाळांनी यावर्षीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत बाजी मारली आहे. िंकंबहुना शहरी शाळांच्या तुलनेत ग्रामीणच्या या शाळा सरस ठरत आहेत. त्यामुळे पालकांचाही शाळांवरील विश्वास वाढत आहे.
शहरात शिक्षणात कमालीची स्पर्धा वाढली आहे. बहुतांश ग्रामीण भागातील पालकांचा शहरी शाळांकडे ओढा असतो. मात्र,दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांमध्येही विशेषत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रयोगशील, मेहनती शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढतच आहे.गुणवत्तेमुळे कसबे तडवळ्याची शाळा पालकांच्या प्रथम पसंतीला उतरली असून, शहरी भागातील मुले या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत. ग्रामीण भागात गुणवत्तेची खाण असताना चर्चा मात्र शहरातील शाळांचीच होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता स्वतःमध्ये बदल घडवून शैक्षणिक स्तरावर स्पर्धा करताना दिसत आहेत.तसेच या शाळा स्वतचे अस्तित्व निर्माण करत आहेत. अनेक शाळांनी शहरी खासगी शाळांच्या तुलनेत अनेक पटींनी यश खेचून आणले आहे.यामध्ये तालुका स्तरावरील प्राथमिक शाळांचेही योगदान नोंद घेण्याजोगे आहे.विशेष म्हणजे मातृ भाषेतील शिक्षणाचे महत्व समजून घेत, मातृभाषा टिकवून ठेवत या शाळा नावलौकीक मिळवत आहेत. शहरी भागात इंग्लिश भाषेचा बागुलबुवा निर्माण करणाऱ्या आणि नियम डावलून उभ्या असलेल्या खासगी प्राथमिक शाळा शैक्षणिक स्पर्धेत केवळ व्यवसायिकता जपत आहेत.त्यामुळेच प्रशासनाला अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत, असे जाहीरपणे सांगावे लागत आहे, हे विशेष.
या शाळांनी मिळवले यश
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत ग्रामीण भागातील तुळजापूर तालुक्यातील बारुळ ,वागदरी, कळंब तालुक्यातील भाटशिरपूरा,हासेगाव केज,कसबे तडवळे आदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.ग्रामीण आणि शहरी भागातील परिक्षेच्या निकालाची गुणवत्ता निरनिराळी असली तरी तुलनेने अलीकडच्या काही वर्षात शिष्यवृत्ती असो की नवोदय परीक्षा ग्रामीण भागातील गुणवत्ता अधोरेखित होत आहे. यशस्वी आणि कालपरत्वे बदल असणारी शिक्षण नीती समाजामध्ये पुन्हा प्रस्थापित होताना दिसत आहे. एकूणच शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक ते पालक, ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि प्रयत्नातून हे शक्य होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे एकूण विद्यार्थ्यांमध्ये मुलींच्या यशस्वीतेचे प्रमाण अधिक आहे.
हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपूरा येथील समीक्षा रितापुरे, शिवक्रांती गायकवाड, प्रगती गायकवाड,विजय पांचाळ तसेच हासेगाव केज येथील प्रांजली अशोक तोडकर, वागदरी येथील 8 वीतील तनुजा सूर्यकांत वाघमारे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. बारूळ येथील यश बालाजी सुपनार, अनुष्का गुरव,सोहम शिवाजी नवगिरे, वैष्णवी प्रभाकर धनवडे, हर्षदा विजयसिंह बारबोले हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत,या शाळेतील मुस्कान बंदेनवाज पठाण या आठवीतील विद्यार्थिनीची इस्रो अंतरीक्ष विज्ञान परीक्षा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.सुविधांची कमतरता असूनही अनेक विद्यार्थी परिस्थितीवर मात करून घडत आहेत.यासोबत क्रीडा, वक्तृत्व स्पर्धांमध्येही ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकत आहेत.