प्रतिनिधी / धाराशिव
शिक्षकांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी शासनाने आज आणि उद्या दोन दिवस प्रेरणा परीक्षेचे आयोजन केले असून,आज पहिल्या दिवशी शिक्षकांनी परिक्षेवर बहिष्कार घातला. शहरातील तीनपैकी एका परीक्षा केंद्रावर केवळ एकच शिक्षक परीक्षेसाठी आले. मात्र त्यांनी परीक्षा न देता आपलाही बहिष्कार कायम ठेवला. त्यामुळे शिक्षकांची गुणवत्ता तपासण्याचा शासनाने आखलेला बेत फेल गेला आहे. दरम्यान शिक्षकांच्या परीक्षेसाठी प्रशासनाने शहरातील विविध 3 केंद्रावर तयारी केली होती. कर्मचारी देखील वेळेवर आले होते, मात्र परीक्षार्थी आलेच नाहीत.
प्रेरणा परीक्षा घेण्याच्या शासनाच्या या भूमिकेला आधीपासूनच विरोध होत होता. शिक्षकांच्या विविध संघटनांनी तसे शासनाला कळविले होते. मात्र तरीही शासनाने परीक्षेचा घाट घातला होता.
परीक्षा आयोजन करण्यामागचा शासनाचा उद्देश विषयज्ञान वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी,असा होता. मात्र केवळ शिक्षकांची गुणवत्ता का तपासली जातेय,अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या परीक्षा का होत नाहीत, असा प्रश्न शिक्षकांतून विचारला जात आहे.त्यामुळे शिक्षक संघटनांनी परिक्षेवर बहिष्कार टाकला होता. त्याचा परिणाम आज दिसून आला.
कर्मचारी परीक्षार्थींच्या प्रतीक्षेत
शहरातील आर्य चाणक्य शाळेवर परीक्षेसाठी 8 हॉल तयार करण्यात आले होते. त्यासाठी 30 वर कर्मचारी नियुक्त करण्यात आले. सकाळी 10 ते 11 व त्यानंतर 11;30 ते 12;30 आणि दुपारी 1 ते 2 अशी परीक्षेची वेळ होती. सकाळी केवळ एक शिक्षक आले त्यांनीही परीक्षा दिली नाही. शहरातील सरस्वती शाळा,अभिनव शाळेतही अशीच परिस्थिती होती.