पुरुषोत्तम आवारे-पाटील / आरंभ मराठी विशेष
पैसा मिळविण्याचे शंभर मार्ग हे पुस्तक ज्यांनी वाचले असते त्यांच्या डोक्यात असंख्य कल्पनांचा पूर येत असतो.पैसे मिळविण्यासाठी जे लोक विविध शक्कल लढवत असतात तसेच मुबलक पैसा असणारे सुद्धा पैशाने काहीही मिळू शकते याची खात्री बाळगून असतात, नव्हे ते सिद्ध पण करून दाखवत असतात.
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात 5 हजार ते 1 लाख रुपयात हवी असलेली कोणतीही पदवी, पीएचडी किंवा डी. लिट. देणाऱ्या बोगस संस्था,विद्यापीठ निर्माण झाली आहेत.त्यात आता विदेशी ठगांचीही भर पडली आहे, काहीही न करता खूप काही प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांची संख्या भारतात खूप असल्याचे लक्षात आल्यावर विदेशी बोगस संस्थानी भारतात एजंट नेमून दुकानदारी थाटली आहे.
काही वर्षापूर्वी तर राज्याच्या राजभवनात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते अश्या बोगस पदव्या,डॉक्टरेट वाटल्या गेल्याचे प्रकरण पत्रकार उन्मेष गुजराती यांनी उघड केले होते. हे प्रलोभन एवढे भन्नाट आणि बेमालूम असते की याला अनेक पत्रकार ,आमदार,मंत्री,वकील, व्यावसायिक सहज बळी पडतात.अनेक आमदार जेमतेम शिक्षण घेतलेले असतात मात्र काही वर्षांनी अचानक त्यांच्या नावाच्या अगोदर डॉक्टर उपाधी लागते, हे घडण्याची प्रक्रिया याच मार्गातून जाते.
देशाची राजधानी दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असे घाऊक पदवी वाटप समारंभ आयोजित केले जातात,दिल्लीत अनेक केंद्रीय मंत्री सहज उपलब्ध होतात.(त्यांना उपस्थित कसे ठेवावे याचे तंत्र राजकीय दलालांना उत्तम अवगत आहे) ज्यांनी अश्या पदवी,डॉक्टरेट साठी नोंदणी केली असते ते लोक पंचतारांकित व्यवस्थेने प्रभावित होतात अन मोठी रक्कम भरून पदवी घेऊन येतात.
पुण्यात आमदार माधुरी मिसाळ यांच्या मुलीला असेच फसवले गेले तेव्हा विदेशी बोगस विद्यापिठ आणि काही संस्थांवर गुन्हे दाखल झाले, केंद्र आणि राज्य सरकारने बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली मात्र ती यादी वाचण्याची फुरसद शिक्षित लोकांना सुदधा नाही हे दुर्दैव आहे.परिश्रम केल्याशिवाय दहावी पास झाल्याचे प्रमाणपत्र सुद्धा मिळत नाही असे असताना लोकांना पदव्या आणि डॉक्टरेट कश्या मिळतात ? हा साधा प्रश्न आपल्या डोक्यात येत नाही हे अधिक गंभीर आहे.
मोबाईल-9892162248