प्रतिनिधी / धाराशिव
डॉ.नितीन बोडके यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर लातूरचे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.सतीश हरदास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच यासंदर्भात आदेश काढले असून,डॉ.हरदास यांनी शुक्रवारी सकाळी पदभार स्वीकारला.डॉ.हरदास हे राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून मुंबईत काम पाहत होते.
धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य सेवेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. हनुमंत वडगावे यांनी धडाकेबाज आणि नियोजनबद्ध कामगिरी केली होती.त्यांनी यंत्रणेत उत्तम सुधारणा केल्या होत्या. विशेष म्हणजे कोरोना काळात त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती.ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्याचा फायदा कोरोना काळात रुग्णांना झाला. त्यांची लातूरला बदली झाल्यानंतर धाराशिवला जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ.नितीन बोडके यांची नियुक्ती झाली होती. वास्तविक पाहता त्यांनी या पदावर काम करण्याऐवजी सुट्यांमध्येच आपला कार्यकाळ घालविला. त्यामुळे आरोग्य विभागातील घडी विस्कळीत झाली होती. त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी झाल्यानंतर त्यांची बदली झाली असून,त्यांच्या जागी मूळ जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी असलेल्या व सध्या आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ.सतीश हरदास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी शुक्रवारी सकाळी पदभार स्वीकारला. यावेळी आरोग्य कर्मचारी तसेच संघटनांनी त्यांचा सत्कार केला.
डॉ.बोडकेचे डिमोशन?
जिल्हा आरोग्य अधिकारी असलेल्या डॉ.नितीन बोडके यांची कामगिरी अत्यंत सुमार होती,त्यामुळे त्यांच्याबद्दल आरोग्य विभागात अनेक तक्रारी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांची बदली लातूरला डॉ.हरदास यांच्या जागी म्हणजे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी पदावर करण्यात आली आहे.