प्रतिनिधी / धाराशिव
उस्मानाबादचे नामांतर होऊन 6 महिने लोटले नाही तोपर्यंत वेगवेगळ्या विभागात शहराचे नाव पूर्वीप्रमाणे उस्मानाबाद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.उच्च न्यायालयाने पुढील निकाल जाहीर येईपर्यंत धाराशिव नावाचा वापर करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असून, त्यामुळे सर्वच विभागात धाराशिव नाव काढून उस्मानाबाद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे,आता एसटी महामंडळाला देखील नाव पूर्वीप्रमाणे उस्मानाबाद करावे लागणार आहे.तशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी महामंडळ विभाग नियंत्रकांना दिले आहे.
राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यात उस्मानाबाद तसेच औरंगाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव आणि छत्रपती संभाजी नगर असे केले होते. या नावाची अंमलबजावणी सुरू होत नाही तोच प्रकरण उच्च न्यायालयात गेले.न्यायालयाने सरकारला याबाबत म्हणणे मांडण्यास सांगितल्यानंतर सरकारने वेळ मागितली. त्यामुळे उच्च न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत नाव बदलू नये,असे सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रशासनाने वेगवेगळ्या विभागांना धाराशिव नावाचा वापर करू नये,अशा सूचना लेखी पत्राद्वारे केल्या आहेत.त्यामुळे ज्या विभागांनी उस्मानाबादचे नाव धाराशिव केले त्या सर्व विभागात आता पुन्हा एकदा धाराशिव नाव वगळून उस्मानाबाद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना लेखी पत्र काढले असून,या पत्राची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नगरपालिका, एसटी महामंडळ तसेच अन्य वेगवेगळ्या विभागांनी नामांतर करून पाट्या बदलल्या होत्या. एसटी महामंडळाने सर्व एसटींवर तसेच आगार आणि बस स्थानकावर उस्मानाबादऐवजी धाराशिव असे लिहिले होते.तसे आदेश महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आले होते. मात्र आता त्यावर बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यामुळे पैशांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होणार,हे नक्की.