आरंभ मराठी / धाराशिव
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. १२) निवडणुका घेण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज अधिकृतपणे निवडणुकांची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील केवळ १२ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण लागू असल्याने पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांतील निवडणुका होणार आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या टप्प्यात जिल्हा परिषदांसोबतच १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा मात्र २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीनंतर करण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण ५५ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांमधील एकूण ११० जागांसाठीही निवडणुका होणार आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेतील ५५ जागांचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. अनुसूचित जातीसाठी एकूण ९ जागा असून त्यापैकी ५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी १ जागा आहे. ओबीसी प्रवर्गासाठी १४ जागा असून त्यापैकी ७ जागा महिलांसाठी आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३१ जागा असून त्यामध्ये १६ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.
या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावे लागणार असून १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम –
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत : १६ ते २१ जानेवारी २०२६
अर्जांची छाननी : २२ जानेवारी २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ : २७ जानेवारी २०२६, दुपारी ३ वाजेपर्यंत
अंतिम उमेदवारांची यादी व चिन्हांचे वाटप : २७ जानेवारी २०२६, दुपारी ३.३० नंतर
मतदान : ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी व निकाल : ७ फेब्रुवारी २०२६
या घोषणेमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे राजकीय वातावरण तापू लागले असून येत्या काही दिवसांत प्रचाराला वेग येणार आहे.









