आरंभ मराठी / धाराशिव
सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री (दि.२३) घडला होता. अपहरण करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरी या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. यातील पाच मुख्य आरोपींना धाराशिव शहर पोलिसांनी अखेर अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून ताब्यात घेतले आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी (दि.२३) सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हॉटेल भाग्यश्री समोर उभा होते. त्यावेळी तिथे एक चारचाकी गाडी आली आणि त्यांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली.
सेल्फी काढण्यासाठी ते जवळ गेले असता, त्यांना तसेच गाडीत ओढण्यात आले. गाडीमध्ये असणाऱ्या पाच जणांनी मडके यांना गाडीमध्ये जबर मारहाण केली. हॉटेलकडून ही गाडी धाराशिव कडे नेण्यात आली. अपहरण करणाऱ्यांकडून मडके यांना जीवे मारण्याचा डाव रचला होता असा आरोप नागेश मडके यांनी केला होता.
पाच जणांच्या या टोळीने मडके यांना जबर मारहाण करून वडगाव (सि.) येथील पुलावर फेकून दिले होते. मडके यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून सदर घटना सांगितल्यानंतर त्यांना धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते असा आरोप नागेश मडके यांनी केला होता. नागेश मडके हे त्यांच्या पत्नीसह पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासही गेले होते. बंदुकीचे लायसन मिळवण्यासाठी नागेश मडके हे हल्ल्याचा बनाव करत आहेत असा आरोप सोशल मीडियावरून केला जात असल्यामुळे या प्रकरणात संशय व्यक्त करण्यात येत होता.
अखेर घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आज जामखेड येथून पाच जणांना अटक केली. यातील चार आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे तर एका आरोपीची तब्येत बिघडल्यामुळे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपींना अटक केल्यामुळे हा हल्ला कोणी आणि कशासाठी केला होता याचे उत्तर मिळणार आहे. पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.