आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातून मोटारसायकलसह इतर मुद्देमाल चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात शनिवारी (दि.6) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
पकडलेले दोघेही धाराशिव तालुक्यातील वरुडा येथील अट्टल चोर असून, त्यांना पकडल्यामुळे धाराशिव शहर व परिसरातील अनेक चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता आहे. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, पोलीस अधिक्षक श्रीमती.
शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे एक पथक चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी पथकाला गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, सिद्राम पोपट पवार व रमेश राजाभाऊ पवार (रा. वरूडा, पारधी पिढी) या दोन अट्टल चोरट्यानी मोटारसायकली, केबल वायर व खापरी पेंडीचे पोते चोरून त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये ठेवले आहेत.
अशी माहिती मिळाल्याने पथकाने मिळालेल्या ठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेतला असता ते पोलिसांना पाहून पळू लागले. त्यावेळी पोलिसांच्या पथकाने शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या घराच्या आजुबाजुची पाहणी केली असता, बाजुस असलेल्या शेडमध्ये लावलेल्या मोटारसाकली, केबल वायर व खापरी पेंडीचे पोते मिळुन आले.
त्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी या मोटारसायकली धाराशिव, भुम, सोलापुर, बीड, केज येथून चोरल्याचे सांगितले.
तसेच केबल वायर, खापरी पेंडीचे पोते हे धाराशिव येथील दुकानातुन व वरूडा रोडवरून जाणाऱ्या ट्रकमधून चोरल्याचे कबूल केले.
या चोरीमध्ये त्यांचा आणखी एक सहकारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्या सर्व मोटारसायकलीची अधिक माहिती घेतली असता, त्या मोटार सायकल आनंदनगर पोलीस स्टेशन, भूम, पोस्टे केज, पोस्टे फौ. चावडी सोलापुर व पोस्टे बीड ग्रामीण येथे चोरी झाल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथकाने दोन पंचाना बोलावुन 5 चोरीच्या मोटार सायकली व केबल वायर, खापरी पेंडीचे पोते असा 2,05,483 रू.चा मुददेमाल जप्त करून आरोपींना आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी सपोनि सचिन खटके, सपोनि अमोल मोरे, पोह/ विनोद जानराव, अमोल निंबाळकर, नितीन जाधवर, मपोह/शोभा बांगर, पोना / बबन जाधवर, चापोह/महेबुब अरब, विनायक दहिहंडे, प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.









