धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबेना
तीन वर्षात कर्जबाजारीपणामुळे ४४० शेतकऱ्यांची आत्महत्या
सज्जन यादव /आरंभ मराठी
धाराशिव
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या धाराशिव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यात शासन व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या नोंदणीनुसार मागच्या तीन वर्षात धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले. यामध्ये २०२४ या एकाच वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १५२ एवढी आहे.
विशेष म्हणजे २०२४ या वर्षात मराठवाड्यात बीड आणि नांदेड नंतर धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेजारच्या लातूर जिल्ह्यात वर्षभरात ८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर धाराशिवची संख्या लातूरपेक्षा दुप्पट आहे. मागील दहा वर्षांचा विचार करता यवतमाळ नंतर शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या धाराशिव जिल्ह्यात झाल्या आहेत.
कर्जबाजारीपणा, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यांमुळे शेतकऱ्यांचे मनोबल दिवसेंदिवस कमजोर होत असून, शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शासन-प्रशासनासह राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ पर्यंत धाराशिव जिल्ह्यात तब्बल ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.सततची नापिकी, हाती येणाऱ्या उत्पन्नाला बाजारपेठेत न मिळणारा समाधानकारक भाव, उभ्या पिकांची वन्यप्राण्यांकडून होणारी नासाडी, तर कधी गारपीट, अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेले उत्पन्न हिरावले जात आहे.
त्यातून कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहेत. मध्यंतरी शासनाच्या वतीने कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला होता. परंतु शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडून न घेता खाजगी सावकारांकडून आणि पतसंस्थेकडून घेतलेली असल्यामुळे कर्जमाफी करूनही शेतकरी कर्जाच्या विळख्यातून सुटले नाहीत.
शेती करत असताना शेतकऱ्यांना हजारो समस्यांचा सामना करावा लागत आहे. बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वाढलेल्या किमती व मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्या तुलनेत शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी व झालेल्या उत्पन्नाला मिळणारा दर अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडत चालले आहे. शेतकरी आर्थिक गर्तेत अडकत असल्यामुळे आर्थिक टंचाईतून आत्महत्यांचे हे सत्र वाढत असल्याचे दिसते.
वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे धाराशिव जिल्ह्याची शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी नकोशी ओळख शासनदरबारी होत आहे. शेती व शेतीपूरक उद्योगांसाठी धाराशिव जिल्ह्यातील वातावरण चांगले असले तरी शासन स्तरावरून अपेक्षित प्रयत्न केले जात नसल्यामुळे फक्त आणि फक्त शेतीवरच इथली संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून राहत आहे.
३३२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत
सन २०२२ ते २०२४ या तीन वर्षात धाराशिव जिल्ह्यातील ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर २०२४ या एका वर्षात १५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तीन वर्षातील ४४० पैकी ३३२ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरवित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
तर ५२ प्रकरणे शासकीय मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत. ५६ प्रकरणे निर्णयासाठी प्रलंबीत असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येते.
मुला-मुलींच्या लग्नाचा प्रश्नही गंभीर
धाराशिव जिल्ह्यात उत्पन्नाचे एकमेव साधन शेती हेच आहे. त्यामुळे मुला-मुलींच्या लग्नाचा देखील गंभीर प्रश्न पालकांना सतावत आहे.
शेतकऱ्यांचे दुःख माहीत असल्यामुळे आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायचीच नाही अशी मानसिकता बनल्यामुळे मुलीचे शहरातल्या शेती न करणाऱ्या मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण बनले आहे.
आर्थिक विवंचनेसोबतच मुला-मुलींच्या लग्नाची चिंता देखील शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे आत्महत्येचा टोकाचा निर्णय शेतकरी घेत आहेत.
तीन वर्षातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी
वर्ष – शेतकरी आत्महत्या
२०२२ – ११७
२०२३ – १७१
२०२४ – १५२
एकूण – ४४०
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली मदत
वर्ष – आत्महत्या – मदतीस पात्र – अपात्र – प्रलंबित
२०२२ – ११७ – १०२ – १५ – ००
२०२३ – १७१ – १४३ – २८ – ००
२०२४ – १५२ – ८७ – ९ – ५६
एकूण – ४४० – ३३२ – ५२ – ५६