धाराशिव / आरंभ मराठी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जीवाची आहुती देणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील पाच युवकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी १० लाख रुपये, अशी एकूण ५० लाखांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
राज्यभरात मराठा समाज आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी तरुणांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या घटनांमुळे समाजमन अस्वस्थ झाले असून, आंदोलनकर्त्यांचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी सरकारने अशा कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत देण्यात आली आहे.राज्यभरातील युवकांच्या वारसांना तातडीने ही मदत देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त ठरलेल्या युवकांमध्ये बालाजी मधुकर भोसले (रा. येडशी, ता. धाराशिव),
प्रतिक रणजीत सावंत (रा. हळदगाव, ता. कळंब),
योगेश संजय जाधव (रा. देवसिंगा, ता. तुळजापूर),
संजय देविदास मोरे (रा.तलमोड, ता.उमरगा),
शिवाजी विठ्ठल निलंगे(रा. पाटोदा, ता. धाराशिव),
या जणांचा समावेश असून, युवकांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी १० लाखांची मदत थेट स्टेट बँक ऑफ इंडिया, धाराशिव शाखेतील खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने संबंधित वारसांचे सर्व कागदपत्रे तपासून मदत वितरणाची कार्यवाही केली. यामुळे आंदोलकांच्या मागणीनुसार दिलेले आश्वासन पूर्णत्वास गेले आहे.
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला बळी पडलेल्या कुटुंबीयांना ही मदत दिल्याने त्यांच्या संसाराला थोडाफार आधार मिळणार असला तरी, तरुणांचे बळी टाळण्यासाठी शासनाने ठोस आणि दीर्घकालीन निर्णय घेण्याची मागणी समाजातून सातत्याने होत आहे.