आरंभ मराठी विशेष
आता कुठं अर्धा पावसाळा संपल्यावर काही तरुणांनी सोशल मीडियावर चिखलमय रस्त्याचे चार दोन फोटो टाकले आणि शहरात जणू समस्येचा महापूर आलाय, अशी परिस्थिती वाटायला लागली… पण असं काहीही नाही. नगर पालिके तू अजिबात चिंता करू नकोस..यापेक्षा कितीतरी भयानक समस्या (किंबहुना त्याला समस्या म्हणावं की नाही हाही प्रश्नच आहे.) आम्ही शहरवासीयांनी यापूर्वीही अनुभवलेल्या आहेत.
अगदी दहा बारा वर्षांपूर्वी दुष्काळात शहराला तीन-तीन महिने पाणी मिळालं नाही तरी आम्ही ब्र शब्द काढला नाही, शहरातील अनेक रस्ते 10-15 वर्षात दुरुस्तच झालेले नाहीत पण आम्ही कधी तुझ्याकडे राग व्यक्त केलाय का..नाही ना.. ?
मग या चिखलमय रस्त्याची एवढी चिंता कशाला..? शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लागत नाही पण महिन्याला 30-40 लाखांचा खर्च आम्हा नागरिकांच्या माथी मारला जातो आम्ही कधी तक्रार करतो का,नाही ना..?
शहरात डुकरांचा कायमच त्रास होतो, लहान मुले शाळेत जाताना अनेकदा डुकरांच्या तावडीत सापडली,पण आम्ही कधी तक्रार केली का, तुझ्या दप्तरी तशी नोंद नाही ना..?
शहरातील विविध भागात समाजसेवक दरवर्षी झाडे लावतात, खरंतर त्यांनाही हे माहिती असतं की ही जबाबदारी पालिकेचीच..पण पर्यावरणाच्या काळजीपोटी त्या बिचाऱ्यांचा हा खटाटोप.. झाडं लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी फक्त काड्या उरतात. केवढी काळजी घेतेस या झाडांची पालिके..
यातून शहर किती सुशोभित होतेय,तुला कल्पना नाही.
आता रस्त्यांचाच विषय निघाला म्हणून आम्हा नागरिकांना तुझी आठवण येणं स्वाभाविक. पण आम्हाला उन्हाळ्यापासूनच याची उत्सुकता होती, आपल्याला पावसाळ्यात चिखलमय गुळगुळीत रस्त्यावरून मार्गक्रमण करायचंय, या आनंदाच्या डोहात आम्ही आकंठ बुडालो होतो. तसं नसतं तर पालिके तुला आम्ही रस्त्यांसाठी सावध नसतं का केलं..?
शहरातून चिखल नव्हे तर विकास वाहतोय जणू,असा आम्हाला पदोपदी भास होतोय. शहर बदलत असताना तक्रार कशाची करायची आणि का करायची..आम्हाला हे प्रश्न पडतात म्हणून तर कुणी गाऱ्हाणं मांडायला तुझ्यापर्यंत येत नाही.
पालिके तू अजिबात चिंता करू नकोस, आम्ही याला समस्या मानतच नाही. हे सगळं आमच्या अंगवळणी पडलेलं.. तू अजून पाच वर्षे रस्त्यांची दुरुस्ती नाही केली तरी आम्ही रागावणार नाही, वाईट बोलून दुखावणार नाही.. आम्ही आहोतच तेवढे संयमी..
हवं तर तू आमच्या सहनशीलतेचा अंत पहा. पाणी पुरवठा बंद कर, पथदिवे बंद ठेव, कचराही गोळा करू नकोस..जागोजागी ढीग लागू देत..नाल्या उपसू नकोस..प्रसंगी आम्ही हाताने नाल्या साफ करतो,
आम्ही कचऱ्याला संपत्ती मानू, विकतच्या पाण्यासाठी फोन करू पण आमच्याकडे ना तुझा नंबर ना ठावठिकाणा..
अशीच संयमाची परीक्षा घेऊन बघ,कायम बघत रहा..
खात्रीने सांगतो, आम्ही धाराशिवकर कदापिही हरणार नाही..अखेर हरशील तूच आणि गुत्तेदारांच्या आग्रहाखातर दुरुस्तीची कामं सुरू करशील.
म्हणून, शहर वासियांनो, चला आपल्या संयमाबद्दल पाठ थोपटून घेऊया…!
– चंद्रसेन देशमुख,