केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे खा.ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील यांची मागणी
आरंभ मराठी / धाराशिव
नीती आयोगाच्या यादीमधून बाहेर पडण्यासाठी जिल्ह्यात रोजगाराच्या समस्येवर काम करण्याची गरज असून, रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभारण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळेच धाराशिव तालुक्यातील कौडगाव एमआयडीसीमध्ये टेक्निकल टेक्सटाईल प्रकल्प वगळून उर्वरित जागेत लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यात यावा, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
सोमवारी त्यांनी संसद भवन येथील कार्यालयात गडकरी यांची भेट घेऊन हे निवेदन दिले.
१५ वर्षांपूर्वी कौडगाव शिवारात एमआयडीसीसाठी एकूण 380.50 हेक्टर क्षेत्र अधिग्रहित करण्यात आले आहे. त्यातील 90 हेक्टर टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी तर 70 हेक्टर प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
उर्वरित 220.50 हेक्टर क्षेत्रावर धाराशिव लॉजिस्टिक पार्क विकसित करता येईल. धाराशिव हे भौगोलिक दृष्ट्या राष्ट्रीय महामार्ग 52, राज्य महामार्ग 67, धाराशिव रेल्वे स्थानकाच्या नजीक असल्याने लॉजिस्टिक पार्कसाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे.
प्रस्तावित सूरत-चेन्नई महामार्ग देखील या परिसरातून जाणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या तसेच दक्षिण भारताच्या व्यापारवाढीला चालना देणारा ठरेल. लॉजिस्टिक पार्कमध्ये कोल्ड स्टोरेज, ड्रोन लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्ट हब, पॅकिंग यासारख्या सेवा विकसित करता येतील.
या प्रकल्पामुळे सुमारे अडीच ते तीन हजार थेट रोजगार व हजारो अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 अंतर्गत धाराशिव जिल्ह्याचा समावेश प्रोत्साहन जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे.
तसेच जिल्हा लॉजिस्टिक नोड म्हणून मान्यता मिळाल्यामुळे या प्रकल्पास धोरणात्मक पाठबळही मिळू शकते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या प्रकल्पाबाबत सकारात्मक आहेत. महाराष्ट्र सरकारकडून प्रस्ताव आल्यास त्याला मंजुरी देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.