एक खासगी सहकारीही अटकेत
आरंभ मराठी/ धाराशिव
शेतावरील कुळाचे नाव कमी करण्यासाठी शेतकऱ्याकडून चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला धाराशिवच्या लाच लुचपत प्रतिबंधकाने रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून, तलाठ्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह लॅपटॉप आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे तसेच तलाठ्याचा खासगी सहकारीही लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला आहे.
ही कारवाई सोमवारी दुपारी तालुक्यातील वाघोली येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली.तलाठ्याच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील तक्रारदाराच्या शेतावरील कुळाचे नाव कमी करण्यासाठी वाघोली येथील सज्जाचा तलाठी भूषण वशिष्ठ चोबे (वय 31 वर्ष, रा.आदर्श नगर, प्रभावन निवास, धाराशिव, मुळ रा. शिरसाव, ता. परांडा) तसेच त्याचा खासगी सहकारी भारत शंकर मगर (वय 64 वर्षे, रा. वाघोली) यांनी 5 हजाराची लाच मागितली होती.
यासंदर्भात तक्रारदार यांच्या शेताची स्थळ पाहणी करुन पंचनामा करुन, पाहणी अहवाल मंडळ अधिकारी यांचे मार्फतने तहसिलदार यांना सादर करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. यासंदर्भात संबंधित शेतकऱ्याने तलाठी भूषण चोबे व त्यांचा खाजगी लिपीक भारत मगर यांच्याविरुद्ध सोमवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी करून पथकाने वाघोली तलाठी कार्यालयात आरोपीची पडताळणी केली असता आरोपी तलाठी भूषण चोबे याने तक्रारदार यांच्या वडिलांचे अर्जावरुन स्थळपाहणी करुन पंचनामा करुन स्थळपाहणी अहवाल सादर करण्यासाठी खाजगी लिपीक भारत मगर याच्या मार्फत पंचासमक्ष 5 हजार रुपये लाच मागणी करुन तडजोडीअंती 4 हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.
तसेच पंचासमक्ष 4 हजारांची लाच स्वीकारण्यात आली.त्यानंतर दोघांनाही पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली तसेच आरोपीच्या अंगझडतीत भुषण वशिष्ठ चोबे याच्याकडे एक 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, एक 30 ग्रॅम वजनाचे चांदीचा कडा, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, एक पार्कर कंपनीचे पेन,एक डेल कंपनीचे शासकीय लॅपटॉप तर खाजगी लिपीक याच्याकडे चार हजार रुपयांची लाचेची रक्कम, रोख 1090 रुपये, सॅमसंग कंपनीचा कीपॅडचा साधा मोबाईल आढळून आला आहे. दरम्यान आरोपीच्या घराची झडती सुरु झाली आहे.
यातील आरोपी तलाठी याच्यावर कलम 12 भ्र.प्र.अधिनियम अन्वये तर आरोपी क्रमांक 2 याचेविरुध्द कलम 7 a भ्र.प्र.अधिनियम अन्वये धाराशिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सापळा अधिकारी म्हणून विभागाचे पोलिस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे तर सापळा पथकात पोलीस अंमलदार नेताजी अनपट, आशीष पाटील, नागेश शेरकर यांनी सदरील कामगिरी केली.