खासदार- आमदारांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, शेतकऱ्यांच्या रोषाची करून दिली जाणीव
आरंभ मराठी/धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांचे, घरांचे आणि जनावरांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र दिवाळी उलटून गेली तरी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात एक पैसाही जमा झालेला नाही. काहींना मिळालेली तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आहे.
सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी दिवाळी गोड होईल, अशी अपेक्षा ठेवली होती, पण त्यांच्या घरात दिवाळीऐवजी काळोखच दिसला. मदतीसाठी आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या या व्यथेला आवाज देत खासदार ओमप्रकाश (ओमराजे) निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी निर्माण झालेल्या तीव्र नाराजीची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने संपूर्ण भरपाई जमा करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच फार्मर आयडी किंवा तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने मार्गी लावून वितरण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानभरपाई वितरण प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. नुकसान प्रचंड असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पूर्ण मदत पोहोचेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील, असे तिन्ही लोकप्रतिनिधींनी सांगितले.
सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले असले तरी कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे सरकार किती वल्गना करून शेतकऱ्यांना भूल थापा देत आहे, याचा महाराष्ट्राला प्रत्यय आला आहे.









