आरंभ मराठी / धाराशिव
साखर कारखान्याचा चेअरमन असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याच्या एका कर्मचाऱ्याची तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी बाबासाहेब कचरु वाडेकर (वय 51 वर्षे, रा. ह.मु. रुम नं 08 आफीसर क्वाटर्स धाराशिव साखर कारखाना चोराखळी) यांना दिनांक 15 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान त्यांच्या मोबाईल फोनवर 725958038 या क्रमांकावरून फोन आला होता.
फोन करणाऱ्या व्यक्तीने धाराशिव कारखान्याचे चेअरमन/सी.एम.डी. अमर पाटील यांचा फोटो डी.पी. ठेवला होता व स्वतःची ओळख लपवली होती. समोरील व्यक्तीने फोनवर बोलताना अमर पाटील असल्याचे भासवुन फिर्यादी बाबासाहेब वाडेकर यांना बँक खाते क्र 20100043466464 वर 1 कोटी 10 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादीने त्याच्यावर विश्वास ठेवून ते पैसे ऑनलाईन ट्रान्सफर केल्याने त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
फिर्यादी बाबासाहेब वाडेकर यांनी दिनांक 17 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4), सह कलम 66 (सी), 66(डी) माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.