खासदार ओमराजे निंबाळकर यांचा तुळजापूरचे आमदार राणा पाटील यांच्यावर नाव न घेता निशाना,
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावरून पुजाऱ्यांसोबत बैठक, १०८ फुटांच्या मूर्तीवरून पुजारी आक्रमक, मुर्तीमध्ये बदलाची मागणी
आरंभ मराठी / धाराशिव
जिसकी भैंस, उसकी लाठी, हे लोकशाहीत चालणार नाही. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांना सत्तेचा माज आला आहे. हा माज योग्य नाही. तुळजाभवानी माते यांना सदबुध्दी दे, अशा शब्दांत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी तुळजापुरातील पुजाऱ्यांनी आराखड्यासंदर्भात काही बदल सूचविले.या बदलाची नोंद घ्यावी, अशाही सूचना खासदार ओमराजे यांनी केल्या.
तुळजापुरात १८०० कोटींचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. या आराखड्यात अनेक त्रुटी असून, पुजारी वर्गाला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार आहे. यानुषंगाने खासदार ओमराजे यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विकास आराखड्यासंदर्भात बैठक घेतली.
यावेळी आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष किर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, अप्पर पोलिस अधीक्षक शफकत आमना, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, पुरातत्व विभागाचे अधिकारी, तुळजाभवानी मातेचे पुजारी, तसेच तुळजापुरातील व्यापारी उपस्थित होते. यावेळी पुजारी बांधवांनी आराखड्यासंदर्भात विविध विषय मांडले.
त्यात तुळजापुरातील रहिवाशी विस्थापित होऊ नयेत, आराखडा राबवताना भाविकांना कुळाचार, परंपरा, विधी करताना कुठेही अडथळे आणले जाऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. मंदीर परिसरात होत असलेल्या विकास कामांमुळे पुरातन मंदिरात काही बदल करण्यात येत आहेत.
त्यात मंदिराच्या भोवती असलेल्या ओवऱ्या काढल्या जाणार असून, भाविकांनी कुळाचार कसे करायचे, असा प्रश्न पुजाऱ्यांनी केला. त्यानंतर आर्किटेक्चर कंपनीच्या प्रतिनिधींनी ओवऱ्या काढल्या जाणार नसून, त्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच आराधवाडी भागात नियोजित असलेल्या ९५ टक्के विकास कामांची जागा पुजाऱ्यांच्या मागणीवरून बदलण्यात आल्याचे सांगितले.
तुळजापुरातील पुजाऱ्यांसोबतच व्यापारी वर्गानेही विविध मागण्या केल्या. स्थानिकांच्या मागण्या ऐकून घेऊन सुधारणा करताना मंदीर प्रशासनाने पुजाऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांना विचारात घ्यावे,अशा सूचना खासदार ओमराजे यांनी केल्या.पुजाऱ्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल त्यांनी तुळजापुरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.