फडणवीस सरकारवर ठाकरे गटाचे प्रवक्ते तानाजी जाधवर यांचा घणाघात
धाराशिव : आरंभ मराठी
धाराशिव शहरातील तब्बल १४० कोटींच्या रस्ते कामांना फडणवीस सरकारने स्थगिती दिली, आणि आता त्याचा दोष आमच्यावर..? म्हणजे अगदी चोराच्या उलट्या बोंबा, अशा थेट शब्दात शिवसेना (ठाकरे गटाचे) जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी हल्ला केला आहे.
जाधवर म्हणाले, निधी मंजूर झाला की श्रेय घेणं त्यांचं आणि कामं अडकली की दोष आमच्यावर टाकणं, हा भाजपचा नवाकोरा प्रकार सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना कमी लेखण्याची स्पर्धाच लावली आहे.
ते पुढे म्हणाले की, १४० कोटींच्या रस्ते कामांच्या निविदांना तब्बल २० महिने लागले, आणि त्यात झालेल्या अनियमिततेबाबत आवाज त्यांच्या ‘मित्रपक्षांकडून’च उठतोय. जिल्हा नियोजन समितीच्या स्थगित कामांवर ढोल वाजवणारे राणा पाटील, आता आपल्या सरकारनेच रस्ते कामं स्थगित केल्यावर विरोधकांवर बोट दाखवतायत, हे निव्वळ हास्यास्पद आहे, असा टोला त्यांनी लगावला.
जाधवर म्हणाले, अहो, ‘दुकान तुमचं, दुकानदारी तुमची आणि तोटा आमच्यामुळे’ हे कोणाला पटेल का? जुलै २०२२ ला महाविकास आघाडी सरकार पडलं, आणि सत्ताधाऱ्यांनी तत्कालीन सर्व मंजूर कामांना स्थगिती दिली. न्यायालयीन निर्णय आल्यानंतरही ती उठवली नाही. मग आमच्या म्हणण्याला एवढं वजन असतं तर ती कामं रद्द झाली असती का?
ते म्हणाले, रस्ते, तीन बगीचा, आठवडी बाजार यांसारखी महत्त्वाची कामं नव्या सरकारने पुन्हा मंजूर केली, पण प्रत्यक्षात एकही काम सुरू झालं नाही. मुख्यमंत्री सांगतील तेव्हाच निर्णय घेतला जातो, मग हाच विनोद नाही का?, दुसऱ्यांना अपप्रवृत्ती म्हणणाऱ्यांनी स्वतःची प्रवृत्ती पाहावी. अपात्र ठरलेला गुत्तेदार पात्र करण्यासाठी २० महिन्यांची धडपड हीच त्यांची ओळख आहे. आम्ही SIT चौकशीची मागणी केली आहे. दोष कोणाचा आहे, हे स्पष्ट होईलच. पण तुमच्या अर्थकारणामुळे शहरवासीयांचे हाल होणं थांबावं. रस्त्यांची कामं लवकर सुरू व्हावीत, हीच आमची खरी भावना आहे.









