उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा
प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव नगर परिषदेत वेगवेगळ्या आर्थिक घोटाळ्यांची मालिका सुरूच असून, आणखी एकामागून एक प्रकरणे समोर येण्याची शक्यता असतानाच मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान हे प्रकरण थेट विधान परिषदेत पोहोचले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत करण्यात येईल,असे जाहीर केले.
धाराशिव नगरपालिकेतंर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य नरेंद्र दराडे यांनी सहभाग घेतला होता. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्या प्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई आणि चालढकल होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी केली जाईल.
घोटाळ्यात अधिकारी,कर्मचारी अडकले
धाराशिव नगर परिषदेत अनेक घोटाळे उघडकीस आले असून अजूनही पालिकेत घोटाळे बाहेर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह काही कर्मचारी अडकले आहेत.काही महिन्यापासून वेगवेगळ्या घोटाळ्यांनी पालिका चर्चेत आली आहे. अजूनही पालिकेत घोटाळ्यांचा वास येतो आहे. त्यामुळे विशेष तपास पथक कसून चौकशी करून प्रकरणाच्या खोलात जाईल,अशी अपेक्षा आहे.