आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीची दुर्दशा करणाऱ्या आणि तरीही प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारीपदाची अतिरिक्त जबाबदारी मिळालेल्या धाराशिव येथील डॉ.अश्विनी गोरे हिला नांदेडमध्ये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे लाचेची रक्कम तिचा पती धाराशिव जिल्हा रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रीतम राऊत याने स्वीकारली.
रक्त ही अत्यंत तातडीची आणि रुग्णांना अत्यावश्यक गरज असते.मात्र धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीच्या अधिकारी असलेल्या डॉ.अश्विनी गोरे हिने रुग्णांना रक्त वेळेत उपलब्ध न करून देणे, उर्मटपणे बोलून अपमान करणे, वाद घालत गरजूंना हाकलून लावणे, रक्तदान शिबिर घेणाऱ्या संस्थांना अरेरावी करणे किंवा रक्तदात्यांशी संबधित रुग्णांना रक्त मिळवून न देता निराश करणे,असे प्रकार घडत होते. त्यामुळेच शासकीय रक्तपेढीची अत्यंत दुर्दशा झाली होती. सामान्यांच्या हक्काचे ठिकाण असूनही जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा सातत्याने तुटवडा तसेच नियोजनातलीही अभाव दिसून येत होता. रक्ताची टंचाई झाल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील विविध संस्था रक्तदान करण्यासाठी पुढे येत असताना डॉ.गोरे हिच्या आडमुठेपणामुळे रक्तपेढीला अपेक्षित सहकार्य होत नव्हते.परिणामी सामान्य गरजू रुग्णाची आर्थिक पिळवणूक होत होती.डॉ.गोरे हीची काही महिन्यांपूर्वी उदगीर येथे बदली करण्यात आली होती. त्यानंतर प्रतिनियुक्तीवर तिला धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्त संक्रमण अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. या काळात तिच्याकडे धाराशिवसह चार जिल्ह्याचा प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यामुळे विभागातील सर्व रक्त पेढ्या तपासणीची जबाबदारी तिच्यावर होती.या अधिकारपदाचा गैरफायदा घेत तिने पतीमार्फत लाच घेतली आणि दोघांनाही बेड्या पडल्या.
काय आहे प्रकरण..?
नांदेड शहरातील डॉक्टर लेन परिसरात असलेल्या अर्पण रक्तपेढीला डॉ.अश्विनी गोरे हिने ७ मार्च रोजी भेट दिली होती. या भेटीत रक्तपेढीचा मनासारखा पाहणी अहवाल देण्यासाठी एक लाख दहा रुपयांची लाच मागितली. पैसे न दिल्यास नकारात्मक अहवाल देईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे कारवाईच्या भीतीने घाबरुन गेलेल्या तक्रारदाराने सुरुवातीला दहा हजार रुपये डॉ. अश्विनी गोरे हिला आणून दिले. उर्वरीत एक लाख रुपये दुस- या दिवशी देण्याचे ठरले. पण लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन बोडके व त्यांच्या पथकाने तक्राराची शहानिशा केली. या पडताळणीत डॉ. अश्विनी गोरे हिने एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हा रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.राऊत जाळ्यात
लाच घेण्यासाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ८ मार्च रोजी मध्यरात्रीची वेळ देण्यात आली. तक्रारदाराकडून डॉ. अश्विनी गोरे हीचा पती आणि सद्या धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात अस्थी रोग तज्ज्ञ असलेला डॉ.प्रीतम राऊत याने माळी असे वेगळे नाव वापरून प्रथम ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली असून,डॉक्टर दांपत्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोग्यमंत्री डॉ.सावंतांच्या जिल्ह्यात डॉक्टरांची लाचखोरी
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या धाराशिवमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर दांपत्याने अन्य जिल्ह्यात जाऊन लाच घेतल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. प्रीतम राऊत हा अस्थिरोग तज्ज्ञ असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याच्या लाचेच्या तक्रारी गेल्या होत्या. त्यामुळे त्याच्याकडील दिव्यांग प्रमाणपत्र विभागाचा पदभार काढून घेण्यात आला होता.वास्तविक अशा अधिकाऱ्यांना शासनाची यंत्रणाच पाठीशी घालत असल्याने सामान्यांना तसेच दोषी नसलेल्यांना नाहक त्रास होतो.