सिताफळांमध्ये अळ्या, मोठ्या रोपवाटिका उभारून प्रसिध्दीचा बाजार मांडणाऱ्यांनी हात झटकले, शेतकऱ्यांना कोट्यवधी रूपयांचा फटका
आरंभ मराठी / सज्जन यादव
धाराशिव: कोरोना काळात पुण्या-मुंबईवरून गावी आलेल्यांनी सिताफळ शेतीचा मोठा प्रयोग गावागावात राबवला. मात्र हा प्रयोग सपशेल फसला असून,सिताफळ शेतीचा बाजार उठला आहे. काही नामवंत रोपवाटिकेच्या मालकांनी जाहिरातबाजी करून शेतकऱ्यांच्या माथी मारलेले सिताफळ अत्यंत फसवे निघाले असून,या सिताफळांमध्ये अळ्या निघत असल्याने ग्राहकांतूनही मागणी नाही तसेच काही दिवसांतच फळ खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील सिताफळ काढून टाकण्यात येत आहे.आम्ही खोट्या यशोगाथा ऐकून सिताफळ शेतीचा प्रयोग केला, अशा भावना आता शेतकरी व्यक्त करत आहेत.
पुण्या-मुंबईत राहून दहा-बारा हजार रुपयांची नोकरी करण्यापेक्षा गावाकडेच राहून प्रगतीशील शेती करू, या विचाराने चार वर्षापूर्वी धाराशिव जिल्हा आणि परिसरात शेतीत बरेच प्रयोग झाले. चांगल्या जमिनीत तसेच पडीक जमिनीत फळबाग लागवडीचे प्रमाण याच काळात वाढले. धाराशिव जिल्हा हा अवर्षणग्रस्त असून,या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे शेतीमध्ये नवनवे प्रयोग करणे तसे धाडसाचे ठरते. त्यात कुठलीही फळबाग लावली तरी पाण्याचा प्रश्न आहेच. कारण फळबागांना इतर पिकांपेक्षा जास्त पाणी लागते. त्यामुळे कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. कोरडवाहू भागातील हलक्या व उथळ जमिनीत पारंपरिक पिकांऐवजी सीताफळाची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे हे सांगणाऱ्या बऱ्याच यशोगाथा ऐकायला आणि वाचायला मिळत होत्या.
या होत्या अनुकूल बाजू
सीताफळ हे हलक्या व मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे आणि अल्प मशागतीत अधिक नफा मिळवून देणारे पीक आहे. तसेच या फळाला उष्ण कोरडे हवामान पोषक असल्यामुळे जिल्ह्यासाठी सीताफळ हे पीक शेतकऱ्यांना संजीवनी देणारे ठरेल असा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. सीताफळ हे फक्त फळ म्हणून खाण्यासाठीच उपयोगाचे नाही तर त्यापासून इतर सह उत्पादने देखील घेता येतात. सीताफळ रबडी, सीताफळ आईस्क्रीम, सीताफळ पल्कही सीताफळाची सह उत्पादने देखील अलीकडच्या काही वर्षात बाजारपेठेत दाखल झाली असल्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या सीताफळ खूप नफा कमवून देणारे पीक असा प्रसार जोरात झाला.
सुरुवातीच्या काळात फायदा
सीताफळ फळासाठी सुरुवातीची दोन वर्षे खूप चांगली आणि फायदा करून देणारी गेली. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षात सीताफळाचा किलोचा भाव ८० ते १०० रुपये असा होता. पुणे, मुंबई, हैदराबाद येथील मार्केटमध्ये सीताफळाला मोठी मागणी होती.
फळांना उठाव नाही
२०२२ च्या वर्ष अखेरीस सीताफळाचे दिवस पालटले. अचानकच लागवड जास्त झाल्यामुळे उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत निर्माण झाली. परिणामी सिताफळांचे भाव खूप कमी झाले. अगोदर ८० रुपये किलो विकलेले सीताफळ ३० ते ४० रुपयावर आले. भाव निम्यापेक्षा जास्त खाली आल्यामुळे उत्पादन खर्च तर नाहीच पण गाडी भाडे निघणे देखील मुश्किल बनले.शिवाय काही रोपवाटिकांनी 80 रूपयांपर्यंत विक्री केलेल्या सिताफळांच्या विशिष्ट वाणांमध्ये दोष आढळून आले.
शेतकऱ्यांची फसवणूक, अळीचे प्रमाण वाढले
बाहेरून चांगले दिसणारे सीताफळ आतमध्ये मात्र अळ्यांनी भरलेले असते, अशा तक्रारी ग्राहक करू लागले. बऱ्याच ग्राहकांना सीताफळाच्या बाबतीत अळ्यांचे अनुभव आल्यामुळे ग्राहकांनी सीताफळ खरेदी बंद केली. व्यापारी आणि ग्राहक दोघांनीही सीताफळाला नाकारल्यामुळे उत्पादित केलेले सीताफळ फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.त्यामुळे शेतकऱ्यांनी बागा मोडल्या तर सिताफळांच्या रोपवाटिकाही मोठ्या प्रमाणावर बंद पडल्या.
सहा वर्षात फायदाच नाही
सहा वर्षे सीताफळाचे उत्पादन घेतले, पण मला एकदाही बाग परवडली नाही. व्यापारी मालाची प्रतवारी करून चांगला तेवढा माल घेऊन जायचे. त्यालाही किंमत देत नव्हते. बाग लावण्याआधी ८० ते १०० रुपये किलो सीताफळ विकते असे ऐकायला मिळायचे. पण मला २० ते २२ रुपयांच्या पलीकडे भाव मिळाला नाही. शेवटी मी कंटाळून बागच तोडून टाकली.
-योगेश पडवळ, शेतकरी-उपळा
सिताफळाच्या खोट्या यशोगाथा
माझी ३ एकर सीताफळाची बाग आहे. २०१९ ला सिताफळाच्या बऱ्याच कथा ऐकल्या होत्या. यावर्षी मी अतिशय उत्तम प्रतीचा माल तयार केला होता. भाव चांगला मिळेल वाटलं पण केवळ १३ रुपये किलोप्रमाणे सीताफळ सोलापूरच्या आडतीवर विकले. त्यात माझे वाहतूक भाडेसुद्धा निघाले नाही. आपल्या भागातील एका व्यापाऱ्याने त्याच्या फायद्यासाठी सीताफळाच्या खोट्या यशोगाथा सांगितल्या. वास्तव वेगळेच आहे. इथले शेतकरी त्या खोट्या सांगण्याला फसले.
रामराजे पडवळ – उपळा
सिताफळात अळीचे प्रमाण वाढले
२०१९ मध्ये दीड एकर क्षेत्रावर सीताफळ बागेची लागवड केली होती. पहिल्या वर्षी मला ४५ रुपये भाव मिळाला होता. तर दुसऱ्या वर्षी ५५ रुपये भाव मिळाला. खर्चाच्या मानाने हे भाव बरे होते. परंतु मागच्या दोन वर्षात सिताफळांचे भाव २० रुपयांच्या खाली आले. त्यात वेगवेगळे रोग आणि अळी यामुळे सीताफळ निकृष्ट दर्जाचे तयार होत आहे. त्याला भावच मिळत नाही. चार महिन्यापूर्वी सीताफळाची बाग तोडून टाकली.
-अनिस शेख, शेतकरी, शेखापूर ता. भूम