उमरगा येथील काँग्रेस नेत्याच्या पक्षांतरावर विधीज्ञ शीतल चव्हाण यांचं विश्लेषण
धाराशिव जिल्ह्यातील कॉंग्रेसचा बडा नेता भाजपाच्या गोटात जाणार या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. मुळात एखादा नेता स्वत:चा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यावरच पक्षभ्रष्ट किंवा पक्षाशी गद्दार होतो, असा सर्रास गैरसमज आहे.
एखादा नेता स्वत:च्या पक्षात राहूनही स्वत:च्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे आणि पोटतिडकीने करीत नसेल, पक्ष सत्तेत नसतानाच्या काळात विरोधक म्हणून जनतेच्या समस्यांना वाचा फोडून रस्त्यावर उतरत नसेल तर त्याचे पक्षात असणे हीच निव्वळ एक औपचारिकता ठरते. म्हणून केवळ पक्ष सोडून जाणे म्हणजेच पक्षाशी गद्दारी नसते तर पक्षात असूनही निष्क्रिय असणे ही पक्षाशी सर्वात मोठी गद्दारी असते. असा नेता पक्षात राहिला काय किंवा पक्ष सोडून गेला काय त्याने फार मोठा फरक पडत नाही. त्याच्या पक्ष सोडून जाण्याने त्याच्या व्यक्तिगत राजकीय कारकिर्दित फरक पडेलही पण जनतेच्या जगण्यावर कसलाही फरक पडत नाही.
शिवाय कॉंग्रेसची एक ठराविक ‘व्होट बॅंक’ आहे. जुने लोक, अल्पसंख्यांक, दलित हे बहुतांश करुन कॉंग्रेसला मतदान करतात. उजव्या पक्षांना आणि निवडून येण्याची क्षमता नसणाऱ्या पक्ष अथवा नेत्यांना हे लोक मतदान करीत नाहीत. म्हणून कॉंग्रेसमधून एखादा बडा नेता बाहेर पडला तर तो फार तर त्याच्या व्यक्तिगत प्रभावाची पाच-दहा हजार मतं घेवून जातो. ही मतं दुसऱ्या एखाद्या पक्षाला निवडून यायला कामाची असतीलही पण नेता गेल्याने पक्ष संपला हे गणित कुचकामी ठरते. कधी-कधी पक्ष बदलाबदलीला वैतागलेले लोक मूळ पक्षाबद्दल सहानुभुतीही दाखवतात.
त्यामूळे आधीच स्वत:च्या पक्षात निव्वळ औपचारिकता म्हणून राहिलेल्या, पक्षाचे काम प्रामाणिकपणे, पोटतिडकीने न करणाऱ्या आणि पडत्या काळात लोकांचा आवाज न होवू शकणाऱ्या नेत्यांनी जेवढ्या लवकर पक्ष सोडला तेवढे पक्षासाठी, लोकांसाठी आणि एकंदर लोकशाहीसाठी चांगलेच आहे. एखाद्या निष्क्रिय नेत्याने आपल्या पुर्वेतिहासातील कर्तृत्वाच्या बळावर पक्षातील आडवलेले एखादे पद खरोखर पात्र व्यक्तीला देता येते. बड्या नेत्याने पक्ष सोडल्यामूळे निर्माण झालेली पोकळी नव्या नेतृत्वाच्या रुपाने भरुन काढता येते आणि आजवर संधी न मिळालेल्यांना संधी देवून नवा चेहरा लोकांसमोर आणता येतो.
त्यामूळे कॉंग्रेसमधील निष्क्रिय असलेले बडे नेते भाजपात जाणार आहेत हा विषय एवढा गांभीर्याने घेवून त्याची चिंता करीत बसण्याची आवश्यकता मुळीच नाही.
ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)