आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती म्हणून बहुतांश ठिकाणच्या जागा एकत्रित लढवल्या जात आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त प्रचार सभेने धाराशिव तालुक्यातील सांजा येथे होणार आहे. दोन्ही प्रमुख नेत्यांच्या भव्य प्रचारसभेची जोरदार तयारी सुरू असून, संयुक्त प्रचार सभेमुळे महायुतीच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो.
नगर पालिकेच्या निवडणुकीतील यशानंतर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषत: भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यात नगण्य स्थान होते. मात्र अलीकडच्या काही वर्षात पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी ४ पालिका ताब्यात घेतल्या. विरोधी पक्षाला एकही पालिका मिळवता आली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे उमेदवारीसाठी चढाओढ लागली.
काही ठिकाणी नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत.मात्र, बहुतांश ठिकाणी महायुती कायम राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रित प्रचारसभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ही सभा जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या धाराशिव शहरालगत सांजा येथील दत्त नगर भागात गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू असून, मतदारांनी तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.









