आरंभ मराठी / धाराशिव
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे शुक्रवारी धाराशिवसह जिल्ह्यातील तीन ठिकाणी सभा घेणार आहेत.
धाराशिवमध्ये दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेच्या (मल्टीपर्पज) मैदानावर त्यांची सभा होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके तसेच तुळजापूरचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील,धाराशिवचे उमेदवार अजित पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धाराशिव जिल्ह्यातील चार पैकी तीन विधानसभा मतदारसंघात म्हणजेच धाराशिव, उमरगा-लोहारा, भूम- परंडा येथे शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेचे नियोजन केले असून, धाराशिव, परंडा आणि उमरगा या तिन्ही शहरात मुख्यमंत्री शिंदे यांची दुपारी सभा होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे.
या सभेची माहिती देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी धाराशिवमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे,जिल्हा उपाध्यक्ष ॲड. नितीन भोसले, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, युवराज नळे, संपतराव डोके,खंडेराव चौरे आदी उपस्थित होते.
विकासावर बोलू – आमदार राणा जगजितसिंह पाटील
यावेळी बोलताना भाजप नेते आणि तुळजापुरचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले की आम्ही विकासाचे बोलू, या मुद्द्यावर निवडणुकीत उतरलो आहोत.विरोधकांनी विकासावर बोलावं. लोकांच्या, मतदारांच्या हिताचे प्रश्न मांडावेत. वैयक्तिक पातळीवर कोणी काहीही मुद्दे उपस्थित केले तर त्याला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. कारण यातून जनतेला काय काहीही मिळत नाही आणि जनतेला त्यात स्वारस्य नसते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्या धाराशिव शहरातील सभेची जोरदार तयारी करण्यात येत असून, या सभेला मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.