आरंभ मराठी / धाराशिव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शनिवारी सकाळी परंडा शहरातील कोटला मैदानात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परंडा येथील कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री दुपारी दीड वाजता धाराशिव शहरात येणार आहेत.हा कार्यक्रम हतलादेवी मंगल कार्यालयात होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध राजकीय पक्षातील युवकांचा पक्षप्रवेश आणि शिवसेनेच्या 190 शाखांपैकी प्राथमिक स्वरूपात काही शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नुकताच शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या सुधीर पाटील यांनी शिवसेनेच्या संघटन वाढीसाठी जोरदार कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा जागांचे वाटप महायुतीमध्ये अजून झालेले नाही. तरीही शिवसेनेने धाराशिव-कळंब, भूम-परंडा आणि उमरगा या तीन मतदार संघावर दावा केलेला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनीही तुळजापूरच्या जागेवरून लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिवमधून शिवसेनेच्या जागांबद्दल आणि उमेदवारीबद्दल काही घोषणा करतात का, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने जागावाटप न करता प्रचाराचा नारळ फोडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यामध्ये काय बोलणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.