आमदार राणा जगजितसिंह पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी मानले सरकारचे आभार
आरंभ मराठी / धाराशिव
प्रशासनाने अचानक वर्ग दोन केलेल्या जमिनी वर्ग एक करण्यास मंत्री मंडळाने मंगळवारी मंजुरी दिली असून, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, मालमत्ता धारकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल, त्यानंतर तातडीने अंमलबजावणी सुरू होईल. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विशेषतः धाराशिव शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे, त्यामुळे आमदार राणा जगजितसिंह पाटील तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत. नाममात्र नजराणा शुल्क भरून जमिनी वर्ग एक केल्या जाणार आहेत.
गेल्या अडीच वर्षापासून प्रलंबित असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील वर्ग दोनच्या जमिनी संदर्भात अनेक आंदोलने झाली तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा केला. 15 दिवसांपूर्वीच यासंदर्भात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाममात्र नजराणा शुल्क भरून वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्यास अनुकूलता दर्शविली होती, यासाठी नेमण्यात आलेल्या पाठक समितीचा अहवाल 15 दिवसांपूर्वी स्विकरण्यात आला होता. त्यावरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्ग-२जमिनीचा विषय शेतकरी व शहर वासियांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा असल्याने आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या विनंतीवरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रालयात बैठक घेतली होती. शासन स्तरावर याबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू होता.तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली होती.
मराठवाड्यातील वर्ग-२ जमिनीचा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा असून, नाममात्र शुल्क आकारून या जमिनी नियमानुकूल करून वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याबाबत जिल्ह्यातील या प्रमुख नेत्यांनी शासनाला अवगत केले होते. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आल्याने विशेषतः जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीचा साकल्याने विचार करून याबाबत योग्य तो कायदेशीर मार्ग काढल्याबद्दल आमदार आ.राणा पाटील, जिल्हाप्रमुख सूरज साळुंके आणि योगेश केदार यांनी सरकारचे आभार मानले आहेत.